"सोलापुरात सुखसमृद्धी येऊ दे, मुबलक पाऊस पडू दे' - महापौर बनशेट्टी

solapur
solapur

सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत  "गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज (सोमवार) सकाळी सोलापूर शहरात आगमन झाले.

महापालिकेच्या वतीने पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत झाले. "सोलापुरात सुखसमृद्धी येऊ दे, मुबलक पाऊस पडू दे' असे साकडे महापौर शोभा बनशेट्टी यांनी संत गजानन महाराजांना घातले. पालखीचे यंदा 51 वे वर्ष आहे. 

महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोलापूरवासीयांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे. या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल,  स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लक्ष्मी बिरु, नगरसेविका श्रीदेवी फुलारे , गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक अविनाश पाटील यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उळे येथून पहाटे  सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले. भजन गात भगव्या पतका हातामध्ये घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते.

महापौर बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, आयुक्त डॉ अविनाश ढाकणे व पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पाणी गिरणी चौकात पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी "श्रीं'ची पालखी कुचन प्रशालेत मुक्कामी असेल. मंगळवारी (ता १७) सकाळी सात वाजता कुचन प्रशालेतून पालखी निघेल. दुपारी ती उपलप मंगल कार्यालयात मुक्कामासाठी येईल. तेथून बुधवारी (ता. १८) सकाळी पालखी निघेल. दुपारी देगाव येथे भोजन व त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे.

सोलापूरकरांना स्मार्ट सुखाचा अनुभव यावा. सर्वजण गुण्यागोविंदाने राहावे. पुरेसा पाऊस पडून धान्याची कोठारे भरावीत, असे साकडे संत श्री गजानन महाराजांना घातले  आहे.
- शोभा बनशेट्टी, महापौर

पालखीतील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. दोन दिवसांचा त्यांचा सोलापुरातील मुक्काम निश्‍चित आल्हाददायक होईल. पालखी मार्गात अडथळा येऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com