सोलापूर- इंद्रभुवनवरील 'आरओ' प्लान्ट काढला 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सोलापूर : ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीवरचा आरओ प्लान्ट काढण्याची कार्यवाही सुरू करून महापालिकेने आपली चूक सुधारली. शेजारी असलेल्या रिकाम्या विस्तीर्ण खोलीत टाक्‍या बसविण्यात येतील. सुरवातीलाच खोलीत टाक्‍या बसवल्या असत्या तर निश्‍चितच विद्रुपीकरण थांबले असते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्लान्ट हलविण्याचे काम सुरू होते.

सोलापूर : ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीवरचा आरओ प्लान्ट काढण्याची कार्यवाही सुरू करून महापालिकेने आपली चूक सुधारली. शेजारी असलेल्या रिकाम्या विस्तीर्ण खोलीत टाक्‍या बसविण्यात येतील. सुरवातीलाच खोलीत टाक्‍या बसवल्या असत्या तर निश्‍चितच विद्रुपीकरण थांबले असते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्लान्ट हलविण्याचे काम सुरू होते.

विद्रुपीकरणाच्या विरोधात "सकाळ'ने सातत्याने आवाज उठवला. स्वच्छ पाण्यासाठी आरओ प्लान्ट बसविण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानुसार प्राधान्याने एक प्लान्ट कौन्सिल हॉलमध्ये बसविण्यात आला. दुसरा इंद्रभुवन इमारतीवर लावला. मात्र, हा प्लान्ट लावण्यासाठी इमारतीच्या भिंतीची काही प्रमाणात पाडापाडी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यावर सर्व स्तरातून टीका सुरू झाली. हेरिटेज असलेल्या या इमारतीची दुरवस्था करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नगरसेवकांपैकी फक्त शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनीच प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, इंट्याकच्या सीमंतिनी चाफळकर व नितीन अणवेकर यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी हा प्लान्ट उभारल्याची काहीच कल्पना नसल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे चाफळकर यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, प्लान्ट काढण्याबाबत सकारात्मक धोरण असून लवकरच कार्यवाही होईल, असे सांगितल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सायंकाळी प्लान्ट हलविण्याचे काम सुरू झाले. या प्लान्टसाठी साडेचार लाख रुपये खर्च झाला आहे. 

महापालिकेतील बाऊंसरही हटविले 
महापालिकेत बाऊंसरची नियुक्ती केली होती. त्याबाबत प्रचंड ओरड सुरू झाली. सोशल मीडियावर तर नागरिकांनी भ्रष्टाचाराचा हा नवा प्रकार आहे, महापालिका म्हणजे डान्सबार नव्हे अशा प्रतिक्रिया नोंदविल्या. बहुतांश अधिकाऱ्यांनीही खासगीत बाऊंसर नियुक्तीबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. अखेर या बाऊंसरची महापालिकेतील नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यांना इतर ठिकाणी नियुक्त केले जाण्याची शक्‍यता आहे, असे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

Web Title: solapur corporation removed r o plant