एस.टी. महामंडळाची 'दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना'

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सर्वसामान्य प्रवाशांना गुणवत्तापूर्ण वस्तू किफायतशीर दरात मिळावे यासाठी ज्वालाग्राही पदार्थ व फटाके सोडून इतर महिला बचत गटाच्या निर्मित वस्तू विक्री करण्यासाठी एस. टी. महामंडळाने 'दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना ' आखली आहे.

अक्कलकोट : दिवाळीच्या वस्तू व फराळ अल्प दराने विक्री करणाऱ्या बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बसस्थाकावर रुपये १ नाममात्र इतके शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दि २८ रोजी केली आहे.

दिवाळीच्या वस्तू व फराळ अल्प दराने विक्री करणाऱ्या अनेक स्टॉल्स बाजारात लागलेल्या दिसतात त्यात बचत गटामार्फत तयार केलेल्या वस्तूला गुणवत्ता व किफायतशीर दर यामुळे ग्राहक वर्गातून जास्त मागणी सतत असते. परंतु बाजारातील प्रस्थापित व्यापाऱ्यांमुळे महिला बचत गटांना आपली विक्री करणे सहज शक्य होत नाही. अशा वेळी बसस्थानाकावर अशा वस्तू विक्री करण्यासाठी महिला बचत गटांनी अध्यक्षांकडे बसस्थानाकावर जागा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती. कारण प्रवाशी गावाकडे जाता जाता या वस्तू खरेदी करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गुणवत्तापूर्ण वस्तू किफायतशीर दरात मिळावे यासाठी ज्वालाग्राही पदार्थ व फटाके सोडून इतर महिला बचत गटाच्या निर्मित वस्तू विक्री करण्यासाठी एस. टी. महामंडळाने 'दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना ' आखली आहे.

यावेळी दि ८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या काळात रुपये १ नाममात्र भाड्याने १०० चौरस फुटाचा १ याप्रमाणे कमाल ५ दालने बस स्थानकाकर देण्याचा निर्णय झाला आहे. असे स्टॉल दिवाळीसाठी सुरू करू इच्छिणाऱ्या बचत गटांनी दि २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आपल्या संबंधित विभागीय कार्यालयात अर्ज सादर करावे असे आवाहन एस. टी. तर्फे करण्यात आले आहे.