स्थायी समितीसाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

सोलापूर - महापालिका स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. समितीतील सर्वाधिक जागा या भाजपच्या राहणार असून, त्या खालोखाल शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएम, बसप व राष्ट्रवादीचे सदस्य असणार आहेत. परिवहन समिती सदस्यांची नावे ऐनवेळी जाहीर केली जाणार आहेत. 

स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेनेचे तीन, कॉंग्रेसचे दोन आणि बसप, राष्ट्रवादी व एमआयएमचे प्रत्येकी एक सदस्य असणार आहे. कॉंग्रेसकडून अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, प्रवीण निकाळजे किंवा नरसिंग कोळी यांच्यापैकी दोघांना संधी मिळणार आहे. शिवसेनेकडून कुमुद अंकारम, विठ्ठल कोटा, गुरुशांत धुत्तरगावकर आणि गणेश वानकर यांच्यापैकी तिघांची नावे चर्चेत आहेत. एमआयएमकडून तौफिक शेख किंवा रियाज खरादी आणि बसपकडून आनंद चंदनशिवे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून स्थायी समिती सदस्यत्वासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता लागली आहे. 

परिवहन समितीत सर्वच पक्षाकडून कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाणार आहे. या पदासाठीही अनेक जण इच्छुक असून, कोणाला उमेदवारी द्यायची हे मोठे आव्हान श्रेष्ठींसमोर असणार आहे. स्थायी समितीपाठोपाठ परिवहन समितीच्या सदस्यांची नियुक्ती 8 मार्च रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत निश्‍चित होणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन महापौर असतील. 

Web Title: solapur municipal corporation standing committee