सोलापूर- भाजपमधील गटबाजी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 27 मे 2018

सोलापूर - पाणीटँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू असताना सभागृहातून 'वॉकआऊट' करण्याची भाजप नगरसेवकांची भूमिका भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे का अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांतही संदिग्धता दिसली, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.

सोलापूर - पाणीटँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू असताना सभागृहातून 'वॉकआऊट' करण्याची भाजप नगरसेवकांची भूमिका भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे का अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांतही संदिग्धता दिसली, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.

सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनीच हा भ्रष्टाचार उघडकीस आणला. दोषींवर कारवाईसाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला असता तर भाजप खऱ्या अर्थाने पारदर्शी कारभार करत असल्याचा संदेश सोलापूरकरांसमोर गेला असता. मात्र, त्या ठिकाणी गटबाजी नडली. श्री. वल्याळ यांनी टँकर घोटाळा बाहेर काढल्यानंतर भाजपमधीलच काही नगरसेवकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्यावर चर्चा सुरू झाल्यावर सभागृहातून बाहेर जाणे हा त्यातीलच एक भाग होता. मात्र त्याबाबत सोशल मीडियावरून चर्चा सुरू झाल्यावर बाहेर गेलेले नगरसेवक एक-एक करत आत आले. तोच धागा पकडत काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी, नगरसेवकांतील गटबाजी व मतभेदांचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी आपली "पोती' ओळखली आहे. अशा प्रकरणात सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे सांगितले. त्यास आक्षेप घेणाऱ्या नगरसेवकांनी भ्रष्टाचारावर एकही चकार शब्द काढला नाही. 

शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका ठामपणे घेतली असताना, याच पक्षातील राजकुमार हंचाटे यांनी मात्र 'शिवगंगा' प्रकरण उपस्थित करून भ्रष्टाचारावरील चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी वेगवेगळी भूमिका घेतली, तर पक्षाची प्रतिमा मलिन होते, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाही माहिती आहे. मग सभागृहात अशी चर्चा होतेच, कशी याबाबत श्री. कोठे यांनीही गांभीर्याने दखल घेणे आवश्‍यक आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली असली तरी, तेही आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की भूमिका बदलतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. "बसप'चे आनंद चंदनशिवे यांनीही, आपण केवळ दलितवस्ती निधीबाबतच नाही, तर सर्वसामान्यांनी कर रूपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणारे नगरसेवक असल्याचे दाखवून दिले पाहिजे, अशी माफक अपेक्षा आहे. 

"तडजोड'कक्षाचा अनुभव नको 
एखाद्या विषयावरून दोषींवर कारवाई होणार असे चित्र सभागृहात निर्माण होते. त्यानंतर महापौर कक्षात (नव्हे तडजोड कक्ष) बैठक होते. त्यानंतर "आक्रमक' झालेले नगरसेवक "मवाळ' होतात, हे अनेक घटनांवरून दिसले आहे. त्यामुळे ज्या नगरसेवकांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठविले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली, त्यांनी अशी प्रकरणे तडीस जाईपर्यंत भूमिकेवर ठाम राहण्याची गरज आहे. अन्यथा भाजपमधील गटबाजीपेक्षा या नगरसेवकांची "तडजोड'वृत्ती सोलापूरवासीयांसाठी घातक ठरेल. 

Web Title: solapur municipal corporation tanker scam bjp role