विमान प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास चिमणी नियमित करू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कायद्याच्या चौकटीत राहून करू कारवाई 
आयुक्त डॉ. ढाकणे

सोलापूर : "विमान प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मी स्वतः नियमित करून देईन. मंजुरी नाकारल्यास मात्र ती पाडावीच लागेल. माझी प्रत्येक कारवाई कायद्याच्या चौकटीत असेल'', असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकारांना सांगितले. 

विमानसेवेला अडसर होत असल्याने चिमणी पाडण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरू झाली. मात्र, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी चिमणी तीन महिन्यांत पाडून घेत आहोत किंवा पर्यायी व्यवस्था करीत आहोत, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडकामाच्या कार्यवाहीस तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली. ही मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. पर्यायी व्यवस्थेबाबत कारखान्याने अद्याप काहीच केले नाही, त्यामुळे पालिकेने दोन वेळेला स्मरणपत्रेही दिली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. तथापि पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 

डॉ. ढाकणे म्हणाले,"सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा आवश्‍यक आहे. विमानसेवेला चिमणी आडवी येत असेल तर ती पाडावीच लागेल. नागरिकांनी विकास हवा की चिमणी हवी हे ठरवावे. आपली कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहूनच असेल.'' 

"विकास हवा असेल तर विमानसेवा सुरू होणे आवश्‍यक आहे. चिमणीमुळे विमानसेवेला कोणतीही अडचण येत नाही असे प्राधिकरणाने लेखी कळविल्यास ती नियमित करून देण्यात येईल. मात्र, चिमणी पाडण्याशिवाय पर्याय नाही असे कळविल्यास मात्र आम्ही कारवाई करणार'', असेही डॉ. ढाकणे म्हणाले. 

कारखान्याला पुन्हा एक स्मरणपत्र 
मुख्यमंत्र्यांनी चिमणी पाडकामास दिलेल्या स्थगितीची मुदत संपण्यास दहा दिवसांचा अवधी आहे. अद्याप याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. मुदतीत पर्यायी व्यवस्था न केल्यास पूर्वनियोजनानुसार कारवाई करावी लागेल, असे आणखी एक स्मरणपत्र महापालिकेने बुधवारी सिद्धेश्‍वर कारखान्यास पाठवले आहे.