पासपोर्टचं झालं... आता बसपोर्ट अन्‌ एअरपोर्टचं तेवढं बघा! 

पासपोर्टचं झालं... आता बसपोर्ट अन्‌ एअरपोर्टचं तेवढं बघा! 

श्रेयासाठी धडपडणाऱ्या राजकारण्यांना सोलापूरकरांचं आवाहन 
सोलापूर - केवळ एका जिल्ह्यासाठी सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठाला 13 वर्षे पूर्ण झाली. आता पासपोर्ट सेवा लघू केंद्राच्या माध्यमातून प्रगतीचे, विकासाचे नवे दालन सुरू झाले आहे. याचे श्रेय मिळविण्यासाठी राजकारण्यांनी धडपड केली. आता सोलापूरकरांची खरी गरज आहे ती बसपोर्ट आणि एअरपोर्ट सुरू करण्याची. यासाठी आता राजकीय धुरिणांनी आपले वजन खर्ची घालण्याची सोलापूरकरांची मागणी आहे. 

सोलापूर शहराच्या दळणवळणाच्या सोयी-सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूर-पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, विजापूर या सर्व मार्गांचा विकास होत आहे. सोलापुरात दरवर्षी सहा हजार अभियंते तयार होत आहेत. त्यात पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांच्या संख्येतही काही हजारांनी दरवर्षी भर पडत आहे. सोलापुरात नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने यातील बहुसंख्य तरुण राज्यातील अन्य शहरांत तसेच परराज्यात जात आहेत.

काही तरुणांनी तर चांगली संधी मिळाली म्हणून थेट परदेश गाठले. सोलापुरातील हजारो तरुणांच्या हाताला परदेशात रोजगार मिळाला आहे. त्यांना व त्यांच्या पालकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागे. यामुळे शारीरिक, आर्थिक झळ सोसावी लागत होती. केंद्र शासनाच्या धोरणामुळे आणि स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापुरात पासपोर्ट सेवा लघू केंद्र सुरू झाले. त्यामुळे सोलापूरबरोबरच शेजारच्या उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्हावासीयांची सोय झाली. आता सोलापूरची खरी गरज आहे.

ती नव्या बसपोर्ट अन्‌ एअरपोर्टची! 
सोलापुरातील होटगी रस्त्यावरील विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा मध्येच खंडित झाली. आता नव्याने प्रश्‍न निर्माण झाला आहे तो सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीचा! या विमानतळावरून सेवा सुरू करण्यासंबंधी दरवेळी होणाऱ्या घोषणा हवेतच विरघळतात. केंद्र सरकारने उडाण योजनेंतर्गत देशातील छोट्या विमानतळावरून सेवा सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. नुकतीच जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची पाहणीही केली. खासदार ऍड. शरद बनसोडे यांनी सप्टेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत या विमानतळावरून सेवा सुरू करण्याविषयी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेचे स्वागत! परंतु ही घोषणाही दरवेळेप्रमाणे पुन्हा हवेत विरघळू नये म्हणजे झाले. विमानसेवेच्या वेळेबाबतही सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. 

सोलापुरात जुना पुणे नाका भागात नवे बसपोर्ट प्रस्तावित आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे या जागेऐवजी जुन्या बस स्थानकावरच बसपोर्ट उभारण्याची कल्पना पुढे येत आहे. एकूण आठ एकर जागेवर हे बसपोर्ट होईल. परंतु यासाठी परिवहनमंत्री असलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या रेट्याची गरज आहे. याबरोबरच दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या जुळे सोलापुरातील बस स्थानकाबाबतही सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. बस स्थानकासाठी ठरविलेल्या तेथील जागेवर वन खात्याचे आरक्षण असल्याची माहिती पुढे आली आहे. यातून मार्ग निघण्याची अपेक्षा आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत... 
खासदार ऍड. बनसोडे यांनी बोरामणी येथील विमानतळ काही सुरू होणार नसल्याचे सांगून मोठा बॉम्बच टाकला आहे. भूसंपादन प्रक्रिया, यंत्रणेकडून पाठपुरावा, प्रशासकीय कामे पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात असताना या विमानसेवेबाबत साशंकता असेल तर सोलापूरच्या दृष्टीने मोठे अडचणीचेच ठरणार आहे. बोरामणी येथील सेवेतून आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com