बेनामी कायद्यामुळे काळ्या पैशावर चाप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सोलापूर - केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या बेनामी कायद्यामुळे काळा पैसा आणि मालमत्तेवर चाप लावण्यात आयकर विभागाला यश येत आहे. असा पैसा अथवा मालमत्ता सापडल्यानंतर ती आपली नसल्याचा दावा केला जातो. बेनामी कायद्यामुळे ही मालमत्ता शासनजमा करण्याचा अधिकार आयकर विभागाला मिळाला असल्याची माहिती उपळाईचे (ता. माढा) सुपुत्र व आयकर विभागाचे (इन्व्हेस्टिगेशन ब्रॅंच) उपसंचालक स्वप्नील पाटील यांनी "सकाळ'ला दिली.

विभागाच्या वतीने सर्व्हे व इतर मोहीम सातत्याने सुरू असतात. नोटीस आल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. तुम्ही जर पगारदार असाल, तुमचा व्यवहार पारदर्शक असेल तर नोटिशीला मुळीच घाबरू नका. नोटिशीमध्ये काय माहिती मागितली आहे, ते बारकाईने वाचा आणि नंतर ती माहिती आयकर विभागाला सादर करा, असे आवाहनही उपसंचालक पाटील यांनी केले आहे. कर भरणाऱ्यांची संख्या वाढावी व कर चुकवेगिरी करणाऱ्यांची सुटका होऊ नये, यासाठी विभागाच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक मोहिमा राबविल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयकर चुकविणाऱ्यांना पकडण्यात कदाचित विलंब होईल, परंतु ते केव्हा ना केव्हा कचाट्यात निश्‍चित सापडतात. आयकर नियमित भरणे केव्हाही चांगलेच आहे. स्वत: व स्वत:चा उद्योग/व्यवसायाची आर्थिक स्थिती त्यामुळे समजते, आर्थिक गणिते आखण्यासाठी सुलभ होते व देशाच्या प्रगतीत हातभारही लागतो. असे पाटील यांनी सांगितले.