महापालिका क्षेत्रात नवीन रिक्षांचीच नोंदणी 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 20 जुलै 2017

सोलापूर - राज्याच्या नवीन धोरणानुसार महापालिका क्षेत्रामध्ये नवीन ऑटो रिक्षांचीच नोंदणी केली जाणार आहे. उर्वरित क्षेत्रात परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या जुन्या रिक्षांची नोंदणी करता येईल. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. 

राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्‍सी परवान्यावरील बंधन 17 जून रोजी उठविण्यात आले. त्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या अहवालानुसार सरकारने नवीन धोरण निश्‍चित केले. त्यानुसार तीनचाकी, तीनआसनी, ऑटो रिक्षा व टॅक्‍सी परवान्यासाठी अटी निश्‍चित केल्या आहेत. अर्जदाराकडे परिवहन संवर्गातील ऑटोरिक्षा, टॅक्‍सी चालविण्यासाठी कॅब "बॅज' असणे आवश्‍यक आहे, अर्जदाराला पोलिसांकडून चारित्र पडताळणीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे, अर्जदारास शासकीय किंवा खासगी क्षेत्रात काम करीत नसल्याचे, तसेच त्याच्या नावे ऑटोरिक्षा किंवा टॅक्‍सीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. 

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरात सीएनजी, एलपीजी अथवा विद्युत ऊर्जेवर चालणारी ऑटोरिक्षा असणे आवश्‍यक आहे. इतर महापालिका क्षेत्रात पेट्रोल, एलपीजी अथवा विद्युत ऊर्जेवरील रिक्षा चालणार आहे. 

विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षांना मीटर असल्याशिवाय परवाने दिले जाणार नाहीत. या संदर्भात राज्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून परवाने द्यावेत, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.