रस्ता वाहून गेल्याने बार्शीचा सोलापूरशी संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

बार्शी तालुक्यातील छोट्याशा पूल उभारणीचे काम मागील दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू आहे.

बार्शी : रात्रभर झालेल्या पावसामुळे राळेरास येथे नागझरा नदीला पूर आला आहे. यामुळे बार्शी-सोलापूर रस्ता बंद झाला आहे. राळेरास येथे मागील दोन वर्षांपासून नदीवर पूल उभारणीचे काम सुरू आहे. याच पुलाच्या कामामुळे नदीत तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता नदीचे पाणी कमी झाल्यानंतरच पर्यायी रस्त्याची अवस्था लक्षात येणार आहे. 

नागझरा नदीला पूर आल्याने बार्शीचा सोलापूरशी असलेला संपर्क तुटला आहे. मागील वर्षी महाड येथे सुमित्रा नदीवर झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या १६५ दिवसांत नवीन पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. तर बार्शी तालूक्यातील छोट्याशा पूल उभारणीचे काम मागील दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे. 

नागझरा नदीचे पाणीकमी होताच बार्शी-सोलापूर वाहतूक सुरु करण्यासाठी तात्काळ पर्यायी रस्ता सुरु करणे आवश्यक आहे. तर बार्शीच्या पूर्व बाजूने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या घोर ओढ्याला पूर आल्याने पुन्हा एकदा बार्शी-भूम, बार्शी-लातूर, बार्शी-उस्मानाबाद/तुळजापूर रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. या ठिकाणी प्रत्येक वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल उभारणे आवश्यक आहे.