भाजपतील गटबाजीला वेसण कोण घालणार? 

भाजपतील गटबाजीला वेसण कोण घालणार? 

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याकडे पाहून सोलापुरातील जनतेने भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून दिली. त्या सत्तेचा सदुपयोग लोकांच्या कल्याणासाठी करण्याऐवजी जनमताचा अनादर करण्याचा चंग दोन्ही मंत्र्यांच्या गटांनी बांधल्याचे शनिवारी घडलेल्या प्रकारावरून सिद्ध होते. त्यामुळे महापालिकेतील या सत्ताधाऱ्यांना आवरणार तरी कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

केंद्रात, राज्यात व महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत प्रचाराला येऊन महापालिकेत एकहाती सत्ता देण्याचे आवाहन सोलापूरकरवासियांना केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र, त्याचा काहीच उपयोग लोकांसाठी व पक्षासाठीही होत नसल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. सोलापूर भाजपमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे गट सर्वश्रुत आहेत. या गटा-तटाच्या राजकारणाचा फटका सोलापूरकरवासियांना बसत आहे. गटा-तटातील भांडणामुळे पक्षाची किती नामुष्की होत आहे, याचा विचारही दोन्ही गटांकडून केला जात नसल्याचे शनिवारी महापालिकेत झालेल्या घटनेवरून दिसून येते. सत्तेच्या जोरावर हवा तो नियम व कायदा करण्याची धमक सत्ताधारी पक्षात असते. मात्र, महापालिकेत सत्ताधारी पक्षाचेच दोन गट असल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळत आहे. शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, बसप या विखुरलेल्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांत असलेल्या सुंदोपसुंदीमुळे एकीचे बळ मिळत आहे. शनिवारी महापालिकेच्या सभागृहात जे काही घडले ते सोलापूरसाठी व भाजपसाठी अतिशय खेदाची गोष्ट आहे. सोलापूरच्या पहिल्या नागरिक असलेल्या महापौरांबद्दल वापरलेले अपशब्द, बहुमत असूनही गाळ्याच्या प्रश्‍नावरून मतदानावेळी भाजपचा झालेला पराभव या दोन्ही गोष्टी पक्षासाठी शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. सोलापूर शहर भाजपत सहकारमंत्री देशमुख व पालकमंत्री देशमुख यांच्यात चाललेले हे छुपे युद्ध पक्षाला कोणत्या पातळीवर नेणार हे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. 

पक्षश्रेष्ठींचेही दुर्लक्षच 
सोलापूर भाजपत दोन देशमुखांचे असलेले "सख्य' पक्षश्रेष्ठींनाही माहिती असेलच. मात्र, त्या "सख्या'कडे पक्षश्रेष्ठींकडूनही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे गेल्या एक-दोन वर्षातील सगळ्या घटनांकडे टाकलेल्या कटाक्षावरून दिसून येते. पक्षश्रेष्ठींनी आता केलेल्या दुर्लक्षाचा फटका भविष्यात पक्षाला बसेल असे वाटते, मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com