बांधकाम परवानगीसाठी घरबसल्या करा अर्ज 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 17 जानेवारी 2018

शासन आदेशानुसार महापालिकेत प्रक्रिया सुरु केली आहे. परिपूर्ण अर्ज असतील तर परवाना दिलेल्या मुदतीपेक्षाही अगोदर मिळू शकतो. भविष्यात गुुंठेवारी, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे अर्ज स्वीकारण्याचीही सुविधा केली जाणार आहे. 
- लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता 

सोलापूर - बांधकाम परवानगी देण्यासाठी महापालिकेत ऑनलाईनची सुविधा करण्यात आली आहे. पूर्वी सायंकाळी ६.३० पर्यंत मर्यादित असेलली ही सुविधा आजपासून (बुधवार)  २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. rts.solapurcorporation.org या लिंकवरुन घरबसल्या हे अर्ज सादर करता येतील. 

राज्यातील नगर परिषदा व महापालिकांमध्ये बांधकाम परवानगी देण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. त्याअंतर्गत संगणकीय आज्ञावली तयार केली आहे. त्यामुळे आता बांधकाम परवानगी अगदी सहजपणे मिळणार आहे. बांधकाम परवाना आता केवळ 45 दिवसांत मिळणार आहे. मिळकतदाराने अर्ज केल्यानंतर बांधकाम परवाना देण्यासाठी 30 दिवस, जोता तपासण्यासाठी सात दिवस आणि वापर परवाना देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. परिपूर्ण अर्ज असूनही या कालावधीत बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शास्तीची कारवाईही होऊ शकते. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याच्या सूचना शासनाने संबंधित विभागाना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ही व्यवस्था केली आहे. 

डिसेंबर 2015 किंवा त्यापूर्वी करण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, विनापरवाना वापर, वापरात बदल अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे शासन निर्णयानुसार नियमित करणे, विकास शुल्क भरू नियमित करणे यासाठी अर्ज करता येतील. 

Web Title: solapur news building permission online