गॅस दरवाढीच्या निषेधार्थ "राष्ट्रवादी'ने वाटल्या चुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

सोलापूर - स्वयंपाकाच्या अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 4. 56 रुपये तर विनाअंशदानित गॅस सिलिंडच्या दरात 93 रुपयांची वाढ झाल्याने देशातील महिला महागाईने होरपळून निघाल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करून महिलांना चुली वाटप करण्यात आले.

"गॅस नको आता चुलचं द्या' यासह अन्य मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी यांना देण्यात आले. या वेळी बोलताना सुनीता रोटे म्हणाल्या, की गॅसवरील अंशदान बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून आजपर्यंत 19 वेळा दरवाढ झाली. कॉंग्रेस सरकारच्या काळात 350 रुपयांना मिळणारा गॅस आता सातशे रुपयांना मिळू लागला आहे. मोदी सरकारने पुन्हा गॅसवर नव्हे, तर चुलीवरच स्वयंपाक करण्यास भाग पडले आहे. त्यामुळे चुली वाटप करून मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे.

देश समस्यांच्या खाईत सापडला असताना मोदी कानावर हात ठेवून गप्प बसले आहेत. गोरगरीब जनतेला मिळणारे रॉकेलही सरकारने बंद केले आहे. गॅस मिळत असला तरी त्यातही सातत्याने दरवाढ होत असल्याने आता सामान्य जनता मोदी सरकारला कंटाळली आहे.
- विद्या लोळगे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस