कौठाळी, दारफळ, कवठे, शिवणी कॉंग्रेसकडे 

कौठाळी, दारफळ, कवठे, शिवणी कॉंग्रेसकडे 

सोलापूर -  उत्तर सोलापूर तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच भाजपने स्वबळावर दोन ग्रामपंचायती जिंकत शिरकाव केला आहे. 12 पैकी चार ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळविण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर सत्ता मिळविली तर एका ठिकाणी बहुमत राष्ट्रवादीचे असताना सरपंचपदाचा उमेदवार मात्र कॉंग्रेसचा निवडून आला आहे. 

तालुक्‍यामध्ये कारंबा येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी तर मार्डी येथे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली होती. रानमसले येथे भाजप-राष्ट्रवादीतील एक गट व कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यात वैशाली गरड यांनी बाजी मारली आहे. डोणगावमध्ये भाजपचे संजय भोसले विजयी झाले. पाकणी ग्रामपंचायत जिंकण्यात भाजपला यश आले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात असलेल्या डोणगाव व पाकणी या दोन मोठ्या ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. कवठे, शिवणी येथे कॉंग्रेसने वर्चस्व राखले आहे. कवठे येथे कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले होते. पाकणी येथील लढतीत सहकारमंत्र्यांचे समर्थक सुनील गुंड यांच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. या ठिकाणी गुंड यांच्या पत्नी शोभा गुंड सरपंचपदासाठी विजयी झाल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत सुनील गुंड यांचा पराभव झाला होता. अकोलेकाटीत राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब लामकाने यांनी इतिहास घडवत राष्ट्रवादीला स्वबळावर सत्तेत आणले आहे. 

तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या मार्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आघाडीने कॉंग्रेसला धोबीपछाड दिले. याठिकाणी एकही जागा जिंकण्यात कॉंग्रेसला यश आले नाही. माजी आमदार दिलीप माने गटाच्या बाबासाहेब पाटील यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. तालुक्‍यातील ही मोठी ग्रामपंचायत आहे. 

सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अविनाश मार्तंडे निवडून आले. कॉंग्रेसने गावडी दारफळ, शिवणी व कौठाळी या तिन्ही ग्रामपंचायती राखल्या आहेत. कौठाळीत राष्ट्रवादीचे बहुमत असताना सरपंच मात्र कॉंग्रेसचे झाले आहेत. कॉंग्रेसचे माजी सरपंच संग्राम पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. शिवणीत बाप-लेकाच्या सरपंचपदाच्या सामन्यात लेक भारी ठरला असून प्रशांत राखे यांनी वडील नागनाथ राखे यांचा पराभव केला आहे. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीने कारंबा ही ग्रामपंचायत कॉंग्रेसकडून खेचून आणली आहे. आघाडीच्या कौशल्या सुतार सरपंचपदासाठी विजयी झाल्या आहेत. डोणगाव येथील शिवसेना, भाजप, कॉंग्रेसच्या तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारली असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक संजय भोसले सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक रामभाऊ हाके यांचा पराभव केला आहे. नंदूरमध्ये सर्वपक्षीय आघाडीने विजय मिळवला आहे. संभाजी पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. कवठे ग्रामपंचायतीत कॉंग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यातीलच माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील गटाने बाजी मारत सत्ता मिळवली आहे. 

ग्रामपंचायतीचे नाव व कंसात सरपंच ः नंदूर-समशापूर (संभाजी पाटील), 
डोणगाव (संजय भोसले), गावडी दारफळ (लतिका लोंढे), मार्डी (अविनाश मार्तंडे), नरोटेवाडी (राधाबाई गाडेकर), अकोलेकाटी (लिंबाजी लामकाने), कारंबा (कौशल्या सुतार), शिवणी (प्रशांत राखे), पाकणी (शोभा गुंड), रानमसले (वैशाली गरड), कौठाळी (चंद्रप्रभा भास्कर), कवठे (जैबोनबी शेख). 

रानमसलेच्या गरड यांचा मोठा विजय 
रानमसले येथे वैशाली नितीन गरड यांनी मिळविलेला विजय हा तालुक्‍यात सर्वांत मोठा विजय आहे. ब्रह्मदेव विकास आघाडीच्या गरड यांनी दोन हजार 344 मतांपैकी एक हजार 800 मते घेऊन एक हजार 369 इतक्‍या मताधिक्‍क्‍यांनी मोठा विजय मिळविला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे पती माजी सरपंच नितीन गरड यांना पराभव पत्करावा लागला होता. पक्षीय राजकारणापेक्षा गरड विरुद्ध शिंदे या दोन पारंपरिक गटामध्येच निवडणूक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com