संचालक दरोडेखोर करताहेत कर्जमाफीची मागणी - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सोलापूर - अनेक संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतली आहेत. त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती असूनही तो बिचारा काहीच बोलत नाही. अशाप्रकारे संचालकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची चोरी केली आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर संचालक दरोखोरांनी कर्ज काढले आहे आणि आता तेच कर्जमाफीची मागणी करत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

शिवार संवाद अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आठ - दहा गावांमध्ये त्यांनी आज दौरा केला. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमात देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, 'शासन कर्जमाफीबाबत सकारात्मक आहे. त्याचबरोबर खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मुख्यमंत्र्यांची आग्रहाची भूमिका आहे. भविष्यात कर्जमाफीबाबत निश्‍चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल.'' ते म्हणाले, की यापूर्वी 2007-08 मध्ये कर्जमाफी झाली होती. त्या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ही शेवटची कर्जमाफी असल्याचे सांगितले होते. तरीही आता पुन्हा कर्जमाफी मागितली जात आहे. 2007-08 ला झालेल्या कर्जमाफीमध्ये पुढाऱ्यांची कर्जे माफ झाल्याचे शेतकरी आताही स्पष्टपणे बोलत आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत चांगला निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

कर्जमाफीचा मुद्दाच अग्रस्थानी
सहकारमंत्र्यांनी शिवारातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला. त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दाच अग्रस्थानी असल्याचे दिसून आले. काहीही करा पण शेतकऱ्यांना कर्जमाफ करा, अशी मागणी शेतकरी सहकारमंत्र्यांकडे करत होते. त्याचबरोबर वीजबिल माफीची मागणीही करण्यात आली.