दोन मीटरपेक्षा जास्त खोलीकरण नको - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

सोलापूर - खडकांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि महाराष्ट्रातील खडकांचा अभ्यास केला असता जलसंधारणाच्या कोणत्याही कामांसाठी दोन मीटरपेक्षा अधिक खोलीकरण अयोग्य आहे. नदी, नाले, ओढ्यांचे पुनर्जीवन करताना दोन मीटरपेक्षा अधिक खोलीकरण करू नये, अशी शिफारस भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने राज्य सरकारला केली असल्याची माहिती यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिली.

सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर गायकवाड यांनी गुरुवारी "सकाळ'च्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी व युनिट व्यवस्थापक किसन दाडगे यांनी त्यांचे स्वागत केले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या नदी, नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामांमध्ये दोन मीटरपेक्षा अधिक खोलीकरण करण्यात आले आहे. त्या दृष्टीने ही शिफारस करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यात राबविण्यात आलेला जलसंधारणाच्या "शिरपूर पॅटर्न'मध्ये ओढ्यांचे खोलीकरण 50 ते 70 फुटांपर्यंत करण्यात आले आहे. बेसाल्टचा खडक ब्लास्टिंग करून फोडण्यात आला आहे. ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या चुकीची व अयोग्य असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

यंत्रणेच्या माध्यमातून चांगले काम होते, संशोधन होते. संशोधनात समोर आलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे या संशोधनाचा प्रत्यक्षात फारसा उपयोग होताना दिसत नाही. यंत्रणेचे काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी संकेतस्थळ व इतर सोशल मीडियाचा उपयोग केला जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
 

प्रत्येक गावांचा भूजल नकाशा
महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये किती भूजल साठा आहे. या भूजल साठ्यानुसार त्या गावात कोण कोणती पिके घेता येतील. पाण्याचे व पिकांचे नियोजन कसे असेल, या बाबतची माहिती मोबाईलच्या माध्यमातून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महाराष्ट्रातील आठ हजार गावांमध्ये ऑक्‍टोबरपासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पहिली कार्यशाळा सोलापुरात होणार असून या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना भूजलाबाबत माहिती दिली जाणार असल्याचेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.