पर्यावरण संवर्धनातून एक वेगळे समाधान!

Solapur
Solapur

पशू-पक्षी आनंदी जीवनाचा संदेश देतात. कितीही मोठे संकट असले तरी डगमगायचे नाही हे पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणातून आपल्याला शिकता येते. सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे. पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची धावपळ होत आहे. घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केल्यास पक्षी आनंदाने येतात. तसेच शेतात किंवा बागेत पाणवठा तयार करून पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल.

प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी न ठेवता पक्ष्यांसाठी खास मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवता येईल, असे आवाहन सोलापुरातील पक्षीप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पशू-पक्ष्यांची काळजी यासह पर्यावरण संवर्धनातील विविध विषयांवर "कॉफी विथ सकाळ'मध्ये चर्चा झाली. पर्यावरण संवर्धनाच्या कामातून एक वेगळे समाधान मिळते. सुरवातीच्या काळात आमचे काम पाहून हसणारी मंडळी आता स्वत:हून आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आम्ही शक्‍य तिथे पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील राहत प्रबोधन करीत असतो. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये व्यक्त केली. 

उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची धावपळ दिसून येतेय. पाण्याअभावी पक्षी दगावतात. प्रत्येकाने घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवावे. सोबत काही धान्य ठेवले तर उत्तमच. काही पक्षी समोर येण्यास घाबरतात, त्यामुळे झाडाच्या आड किंवा एखाद्या कोपऱ्यातही पाण्याची व्यवस्था करता येईल. शाळांमधील विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला प्रवृत्त करावे. त्यांना दैनंदिन निरीक्षण अहवाल तयार करण्यास सांगता येईल. उत्तम अहवालास बक्षीसही देता येईल. 
- सिद्राम पुराणिक, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक 

आम्ही सोलापूरकरांना निसर्ग संवर्धनासाठी प्रोत्साहन देत आहोत. घराच्या परिसरात बाग कशी फुलवायची याबाबतची माहितीही आम्ही देतो. घरच्याघरी कंपोस्ट खत बनविण्याबाबत प्रात्यक्षिकही करतो. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत. प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात येणार आहे. आपल्याला जगायचे असेल तर झाडांची लागवड आणि संगोपन केलेच पाहिजे. टाकाऊ वस्तूंपासून विशेषत: प्लास्टिक बाटलीमध्ये रोपे कशी लावायची याबाबतही आम्ही प्रबोधन करतोय. सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी बियांचे संकलन करावे आणि इतरही प्रयोग करून पाहावेत. गावाला जाताना बिया रस्त्याच्या कडेने टाकायच्या. यासाठी शाळांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 
- ऍड. सरोज बच्चूवार, सोलापूर निसर्गप्रेमी संघटना 

ऍनिमल राहत ही संस्था 2005 पासून कष्ट करणाऱ्या म्हणजेच बैल, गाय, घोडा, गाढव जनावरांवर उपचार करत आहे. गावागावांमध्ये लोकांचे प्रबोधनही करतो. स्वच्छ पाणी मिळत नसल्याने जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतेय. प्रत्येकाने जनावरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला हवी. माणसांप्रमाणेच जनावरांची काळजी घ्यायला हवी. रस्त्यावर आजारामुळे भटकणाऱ्या कुत्र्यांवरही आम्ही उपचार करतो. मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था केल्यास पक्षी घराच्या परिसरात येतात. हातपंपांवर आम्ही पाण्याचे कुंड दिले आहेत. परिसरातील नागरिकांना ते कुंड पाण्याने नियमित भरण्यासाठी व स्वच्छ करण्यासाठी सांगतो. शेवाळ झालेले पाणी जनावरांना पिण्यासाठी देऊ नये. त्यामुळे जनावरे आजारी पडू शकतात. पाण्याच्या कुंडात, टाकीत शेवाळ होऊ नये म्हणून तळात चुना लावावा. 
- डॉ. भीमाशंकर विजापुरे, ऍनिमल राहत संस्था 

बक्षीहिप्परगा परिसरात आमची शेती आहे. शेतामध्ये 250 झाडे लावली असून नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या माध्यमातून शेतामध्ये पाणवठा तयार केला. पाणवठा तयार केल्यानंतर दोन-चार दिवसांतच पक्षी यायला लागले. पक्षी येऊन पाणी पितात तेव्हा समाधान मिळते. त्यानंतर माझ्या मित्रांनी चौकशी केली. मग मित्रासह इतर अनेकांच्या शेतात पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. पाणवठ्याच्या परिसरात बसून आम्ही पक्षी निरीक्षणही करतो. घराच्या परिसरातही पक्ष्यांसाठी पाण्याची आणि धान्याची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये पाणवठे तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत. 
- बसवराज बिराजदार, युवा शेतकरी 

नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन पाणवठे तयार करण्याची मोहीम सुरू आहे. पाणवठ्यासाठी दोन बाय तीन या आकाराचा आणि 20 सेंटिमीटर खोलीचा खड्डा करावा. खड्ड्यात आधी गवत टाकायचे. त्यावर जाड प्लास्टिक अंथरायचे. बाजूने दगड ठेवून त्यावर माती टाकायची. पशू-पक्ष्यांना हा पाणवठा कृत्रिम आहे असे वाटू नये याची काळजी घ्यायची. पाणवठ्यामध्ये नियमितपणे पाणी घालावे. पाणवठ्यावर पशू-पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी वेळ देत आहोत. 
- संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल 

आपल्याकडे चिमणी, कावळा, कबूतर, पोपट यासह 555 प्रजातीचे पक्षी आढळून येतात. उन्हाळ्यात घराच्या परिसरात पाण्याची व्यवस्था केल्यास चिमणी, कावळ्यासह इतरही पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. आम्ही अपरिचित संस्थेच्या वतीने टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी पाणपोईची संकल्पना राबविली आहे. मी एकदा बॅंकेत कामानिमित्त गेलो होतो. मला तहान लागली होती. शोधाशोध करूनही पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्यानंतर पाण्याअभावी पक्ष्यांचे किती हात होत असतील हा विचार मनात आला आणि मग पक्ष्यासांठी पाणपोईची संकल्पना हाती घेतली. 
- मयूर गवते, अध्यक्ष, अपरिचित संघटना 

पक्षी हे पिकावरील कीटक खातात. त्यामुळे शेताच्या परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे. यासाठी शेतामध्ये दोन-तीन ठिकाणी पाणवठा तयार करायला हवे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन आम्ही दरवर्षी करतो. यंदा सोलापूर परिसरातील शेतांमध्ये जाऊन पाणवठे तयार करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. शहरातही जागा असेल तिथे पाणवठे तयार करता येऊ शकतील. 
- पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल 

मित्रांच्या मदतीने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील दुभाजकांत आम्ही रोपे लावली. त्यांचे संवर्धनही करतो. सुरवातीच्या काळात अनेकांनी आम्हाला हसण्यावर नेले. तरीसुद्धा आम्ही काम थांबविले नाही. झाडांना पाणी घालताना पाहून अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. सध्या आम्ही कारमध्ये पाण्याची टाकी ठेवून पाइपद्वारे झाडांना पाणी घालतो. सोलापूरकरांनी वृक्षारोपण करून न थांबता त्यांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत. कौटुंबिक कार्यक्रमात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करायला आम्ही सुरवात केली आहे. 
- श्रीनिवास यन्नम, अतुल्य भारत प्रतिष्ठान 

शहरातील भाजी मंड्यांमध्ये काही विक्रेते सायंकाळी घरी जाताना उरलेला भाजीपाला तसाच टाकून जातात. दुसऱ्या दिवशी हा भाजीपाला आणि इतर फळभाज्याही कचऱ्यात जातात. अभ्यासकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास कचऱ्यात जाणाऱ्या भाज्यांपासून खत तयार करता येईल. पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याची तरुणांची इच्छा आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजच्या मुलांना टाकाऊ वस्तूंपासून चिमणीसाठी घरटे कसे बनवायचे याबाबतची माहिती आम्ही देत असतो. 
- पृथ्वीराज पाटील, सदस्य, इको फ्रेंडली क्‍लब 
 
उन्हाळ्यात अनेकजण पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात, पण नियमित पाणी बदलले जात नाही. पाणी संपले असले तर पाणी घातले पाहिजे. प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवू नये. पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यासाठी खास मातीची भांडी बनवून घ्यावी. घराच्या परिसरात विविध रोपे, फुलझाडे लावली तर पक्ष्यांसह फुलपाखरेही येतात. आम्ही इको फ्रेंडली क्‍लबच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सीड बॉल बनविण्याची कार्यशाळा घेतो. माती आणि शेणाच्या मिश्रणात विविध झाडांच्या बिया टाकायच्या. माती आणि शेणाच्या गोळ्याला बॉलसारखा आकार द्यायचा. हे सीड बॉल वाळवून भटकंतीदरम्यान टाकायचे. पाण्याशी संपर्क येताच सीड बॉलमधून रोप तयार होऊन ते मातीत रुजेल. 
- कृष्णा जाधव, सदस्य, इको फ्रेंडली क्‍लब 
 
आम्ही महिला आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करतोय. युगंधर ग्रीन आर्मी हा उपक्रम ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपल्याकडे पक्षी भरपूर आहेत. घराच्या परिसरात झाडांची लागवड केल्यास पक्षी आणि फुलपाखरे येतील. नुसतेच झाड लावून न थांबता संवर्धनासाठी प्रयत्न करावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम करून घ्यावेत. यासाठी पालक आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. 
- प्रा. रश्‍मी माने, अध्यक्षा, युगंधर फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com