अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे काम अपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

शिक्षण आयुक्तांकडून 23 सप्टेंबरची अंतिम मुदत

शिक्षण आयुक्तांकडून 23 सप्टेंबरची अंतिम मुदत
सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना वारंवार दिल्या होत्या. मात्र, अद्यापही ते काम पूर्ण झाले नाही. यासाठी शिक्षण आयुक्तांनी 23 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी यापूर्वी 31 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार सप्टेंबरला बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये राज्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजनाचे काम अपूर्णच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अतिरिक्त शिक्षक समायोजनाचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी राज्यातील आठ शिक्षण उपसंचालकांना निर्धारित वेळापत्रक करून देण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला.

आयुक्तांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विभागांनी 23 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. हे काम पूर्ण करून घेण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण आयुक्तांनी दिला आहे. पुणे येथे येऊन ही सर्व माहिती भरण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.