पीकविम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सोलापूर - हवामानाधारित फळपीक विमा योजनेमध्ये डाळिंब पिकासाठी 2015-16 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यातील काही शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही. या पैशांसाठी शेतकऱ्यांना बॅंकेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. 

जिंती (ता. करमाळा) येथील शेतकरी दिलीप दंगाणे यांनी या योजनेमध्ये पिकाची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडेही याची तक्रार केली आहे. याविषयी दंगाणे म्हणाले, ""जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात चौकशी केली असता 24 मे 2017 रोजी हवामानाधारित फळपीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई संबंधित बॅंकांकडे जमा केल्याचे सांगण्यात आले. इतर बॅंकांमध्ये भरलेल्या पीकविम्याच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मात्र, बॅंक ऑफ इंडियामध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. याबाबत बॅंक ऑफ इंडियामध्ये विचारणा केली असता संबंधित विभागाचे अधिकारी प्रशिक्षणाला गेले असल्याचे सांगण्यात आले.'' 

""विम्याच्या न मिळालेल्या 91 लाख रुपयांमध्ये 183 शेतकऱ्यांचे 67 लाख 78 हजार, तर 66 शेतकऱ्यांचे 23 लाख 78 हजार रुपये आहेत. विमा कंपनीकडून पैसे मिळाले आहेत. मात्र, केवळ बॅंकेच्या बेफिकिरीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम मिळाली नाही,'' असे दंगाणे यांनी सांगितले.