किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

अठरा दिवसांपूर्वी २५ ऑक्टोबरला द्राक्षाच्या बागेत एका खासगी कंपनीचे किटकनाशक फवारणी करीत असताना संतोष शिंदे बेशुध्द झाले होते. त्यांना मोडनिंब येथील खासगी दवाखान्यातून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गेल्या १८ दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला

सोलापूर - पिकाला किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन माढा तालुक्‍यातील अरणच्या एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. अठरा दिवसांपूर्वी उपचारासाठी या शेतकऱ्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण  दुर्दैवाने आज (सोमवार) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित कृषी अधिकारी आणि कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी घेतल्याने संबंधित रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण झाले. संतोष बाळासाहेब शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अठरा दिवसांपूर्वी २५ ऑक्टोबरला द्राक्षाच्या बागेत एका खासगी कंपनीचे किटकनाशक फवारणी करीत असताना संतोष शिंदे बेशुध्द झाले होते. त्यांना मोडनिंब येथील खासगी दवाखान्यातून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गेल्या १८ दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना आधी बोलवा, अशी मागणी देखील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. दुपारी उशीरापर्यंत नातेवाईक आणि पोलिस प्रशासनात चर्चा सुरू होती. संतोष शिंदे यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना सात महिन्यांची एक मुलगीही आहे.