अवेळी वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

भारनियमन बंदचा महावितरणचा दावा; पूर्वीप्रमाणे वीज देण्याची मागणी

भारनियमन बंदचा महावितरणचा दावा; पूर्वीप्रमाणे वीज देण्याची मागणी
सोलापूर - मागील काही दिवसांपासून महावितरणच्या वतीने राज्यभर भारनियमन चालू केले होते. ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. भारनियमनामुळे शेतीसाठी रात्रीचा अवेळी वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

मागील एक-दोन दिवसांपासून भारनियमन बंद झाल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण राज्यभर शेतीसाठी रात्री अवेळी वीजपुरवठा केला जात आहे. पूर्वी रात्री दहा तास तर दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. भारनियमन सुरू झाल्याने दोन्ही वेळी शेतीचा वीजपुरवठा आठ तासांचा केला आहे. या बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, विजेचा तुटवडा हळूहळू भरून येत आहे, गावात भारनियमन बंद आहे. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेतही पूर्वीप्रमाणे बदल केला जाईल, असे सांगितले जात आहे.

भारनियमन सुरू होण्यापूर्वी ज्याप्रमाणे शेतीसाठी वीज दिली जात होती. त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून 12 तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.