हरीत क्षेत्र विकास प्रकल्पास शासनाचा "हिरवा कंदील' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

या योजनेंतर्गत ही होतील कामे 
घटक संख्या रक्कम रुपयांत 
-------------------------------------------- 
वृक्षारोपण 11509 1,09,48,512 
गुलाबाची झाडे 805 1,10,728 
मोगऱ्याची झाडे 2150 2,50,583 

सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात करण्यात येणाऱ्या हरितपट्टे प्रकल्पासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेस 2 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत. 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास या सुविधांची निर्मिती राबविली जाणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र शासनाने राज्याच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये सोलापूर शहराच्या हरित क्षेत्र विकास आराखड्याचा समावेश आहे. 

राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रकल्प अहवाल सोलापूर महापालिकेने तयार केला होता. त्यास नगरअभियंत्यांनीही मंजुरी दिली आहे. त्यानुसार 2017-18 या आर्थिक वर्षांतील प्रकल्पास मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे आला होता. त्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 

यापूर्वी महापालिका प्रशासनाने सोरेगाव उद्यान, कृष्णा कॉलनी, जानकीनगर आणि रोहिणीनगर येथील उद्यान विकासाचे प्रस्ताव दिले आहेत. या योजनेंतर्गत 3047 स्केअरमीटर परिसरात झाडे लावली जाणार आहेत. 

केंद्र शासनाने हा प्रकल्प सुरु केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 22 मार्च 2017 रोजी विशेष आदेश जारी केला आहे. 

सोलापूर शहरात हा प्रकल्प राबविण्यासाठी कोल्हापुरातील इनग्रच आर्किटेक्‍टस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी प्रकल्पासाठी  आरक्षित असलेल्या जागांची माहिती, आरक्षणांची माहिती मागितली आहे.