जवान जुबेरपाशा काझी यांना दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल 'सेना मेडल'

अक्षय गुंड
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच सन 2000 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. आसाम, ग्वाल्हेर, गलशेर, जम्मू काश्मीर, श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सेवा बजावली आहे.

उपळाई बुद्रूक, (ता. माढा, जि. सोलापूर) : श्रीनगर येथील उरी सेक्टरमध्ये कार्यरत असलेले उपळाई बुद्रूकचे (ता.माढा) सुपुत्र जवान जुबेरपाशा हबीब काझी यांनी सीमेवर आंतकवाद्याशी लढून दोन दहशतवादी ठार केल्याने त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सैन्यदलातील 'सेना मेडल' त्यांना जाहीर झाले असून, सात सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

जुबेरपाशा हबीब काझी यांची लहानपणापासुन सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करायची हे स्वप्न होते. त्यामुळे दहावीचे शिक्षण पुर्ण होताच त्यांनी भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच सन 2000 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. आसाम, ग्वाल्हेर, गलशेर, जम्मू काश्मीर, श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सेवा बजावली आहे.

श्रीनगर येथील उरी सेक्ट मध्ये 26 जुन 2016 रोजी सायंकाळी सहा वाजता दोन अतिरेकी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने कडुन कॅम्प मध्ये मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचे आठ जवान त्या दिशेने निघाले असता, पंधरा मिनिटांच्या अंतरावर अतिरेकी व भारतीय जवानांची चकमक सुरू झाली. अर्धा ते पाऊणतास झालेल्या या चकमकीत दोन अतिरेकी ठार करण्यात जुबेरपाशा काझी व इतर सात जवानांना यश मिळाले. अशी माहिती जवान जुबेरपाशा काझी यांनी 'सकाळ' ला दिली.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने जवान जुबेरपाशा काझी यांना 'सेना मेडल' जाहीर केले आहे. उपळाई बुद्रूक गावातील जुबेरपाशा काझी हे अतिरेक्यांना मारणारे पहिले जवान असुन त्यानिमीत्ताने 26 आॅगस्ट रोजी शहिद जवान शंकर शेलार प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.