किसान सेनेचा गुरुवारी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

सोलापूर - सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मंद्रूप गावातील ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न सोडवावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सेनेच्यावतीने गुरुवारी (ता. 7) मोर्चा काढण्यात येणार आहे. मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) ते सहकारमंत्री देशमुखांचे सोलापुरातील जनसंपर्क कार्यालय या दरम्यान पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

किसानसभेचे तालुकाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके म्हणाले, की मंद्रूपच्या ग्रामस्थांना एक-एक महिना नळाद्वारे पाणी मिळत नाही. मंद्रूपच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तीन महिन्यांत सोडविण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री देशमुख यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिले होते. एप्रिल 2017 मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला सरकारकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली; परंतु 100 टक्के स्वच्छतागृहाची अट व वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) वाढीव रकमेमुळे या योजनेचे काम ठप्प झाले आहे.