महावितरणचा 'टोल फ्री' नावालाच!

संतोष सिरसट
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

"टोल फ्री' क्रमांक असलेली सेवा ही रेकॉर्डेड असते. ते तक्रार नोंदवून घेतात. त्यानंतर ती तक्रार संबंधित विभागाकडे पाठविली जाते. संबंधित विभागाकडे ती तक्रार दूर करण्याची जबाबदारी असते. ती त्यांनी पार
पाडायलाच हवी.
- नागनाथ इरवाडकर, मुख्य अभियंता, बारामती परिमंडळ

स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी

सोलापूर: महावितरण ऑनलाइन झाल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होत असल्याचा डांगोरा पिटविला जात आहे. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर स्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. महावितरणच्यावतीने देण्यात आलेला "टोल फ्री' क्रमांकही नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून समस्यांचे निराकरण होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.

वितरणच्यावतीने ऑनलाइन कामावर जोर दिला जात आहे. त्याच्या मोठ्या प्रमाणात बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असतात. अनेकवेळा त्यामध्ये "टोल फ्री'  क्रमांकाचाही उल्लेख केला जातो. मात्र, या टोल फ्री क्रमांकाबाबत ग्राहकांचे अनुभव अतिशय वाईट आहेत. या क्रमांकावर ग्राहकांची तक्रार नोंदवून घेतली जाते. पुढील एक-दोन दिवसामध्ये तिचे निराकरण केले जाईल, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात यापैकी काहीच होत नसल्याचा अनुभव काही ग्राहकांनी सांगितला आहे. टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर तक्रारदार ग्राहक ज्या विभागातील आहे, त्या विभागातील स्थानिक अधिकारी तक्रारदाराच्या घरी पोचून तिचे निवारण करतील, असे उत्तर टोल फ्री क्रमांकावरून दिले जाते. त्यासाठी एक-दोन दिवसाची मुदतही दिली जाते. दोन दिवसाची मुदत संपूनही त्याचे पुढे काहीच होत नसल्याचेही ग्राहकांनी "सकाळ'ला सांगितले.

स्थानिक पातळीवर असलेले अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी व्यवस्थितपणे बोलत नसल्याचेही अनेकवेळा दिसून आले आहे. ग्राहकाकडून तक्रार अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसले आहे. अनेक प्रकारच्या चुका महावितरणकडून केल्या जातात. त्याचा फटका मात्र ग्राहकांना सहन करावा लागतो. काहीवेळा मीटर नादुरुस्त होते. त्याबाबत लेखी तक्रार करूनही ते बदलून दिले जात नाही. एवढेच नाही तर चालू असलेल्या मीटरचे रीडिंग अचानकच ग्राहकांचा "ब्लडप्रेशर' वाढेल इतके दिले जाते. त्यामध्ये संबंधित ग्राहकाचा काहीही दोष नसतो. मात्र, महावितरणच्या या ढिसाळ यंत्रणेचा फटका ग्राहकाला बसतो. मीटरचे रीडिंग वाढवून आल्यानंतर साहजिकच त्याचे बिलही वाढूनच येते. त्यावेळी वाढून आलेले बिल पहिल्यांदा भरा, त्यानंतर मीटर रिडींगमध्ये दुरुस्ती करू अशी स्पष्टोक्ती अधिकाऱ्यांकडून दिली जाते. काहीही चूक नसताना संबंधित ग्राहकाला याचा फटका बसतो. महावितरणने केवळ कागदोपत्री ऑनलाइन होऊन चालणार नाही. तर स्थानिक पातळीवर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यावरही भर द्यायला हवा. मात्र, दुर्दैवाने तसे होत नसल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण