सक्षम, उद्योजिका होण्याचा विद्यार्थिनींना कानमंत्र 

सक्षम, उद्योजिका होण्याचा विद्यार्थिनींना कानमंत्र 

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाला. स्वतःवर विश्‍वास ठेवून फक्त स्वप्न न पाहता त्या स्वप्नाकडे झेप घेण्यासाठी काय काय करावे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 

"सकाळ'चे संस्थापक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात"सिक्षम मी समर्थ मी' या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व "सकाळ तनिष्का' बोरामणीच्या गटप्रमुख अनिता माळगे यांनी मार्गदर्शन केले. 

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शर्मिष्ठा घारगे म्हणाल्या, ""दसरा म्हणजे फक्त सण किंवा उत्सव नव्हे तर जुने सर्व सोडून नव्या उमेदीने पुढे जाण्याचा मार्ग असा अर्थ आहे. नवरात्र म्हणजे स्त्रियांच्या आत असणाऱ्या शक्तीची आराधना करणे असे आहे. आपल्या मनात अशा प्रकारची शक्ती असल्याचे आपल्याला माहीत नसते. ज्या स्त्रियांनी प्रगती केली ती स्वतःची शक्ती ओळखून केली आहे. स्वतःला दुबळे न मानता स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत.'' 

अनिता माळगे म्हणाल्या, ""यशस्विनी ऍग्रो फूड कंपनीच्या माध्यमातून आता आम्ही उद्योग उभारला आहे. हे काम करताना "सकाळ'ची साथ मिळाली. "तनिष्का' गटाचे काम करताना असे काम आपल्याला करण्यास मिळेल असे वाटले नव्हते. प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही असे म्हणतात, माझ्याही बाबतीत तसेच घडले. बोरामणीत "सकाळ तनिष्का'च्या व्यासपीठ आधारे स्वच्छतागृह बांधण्यात आली. पाझर तलावात 20 वर्षे साठलेला गाळ काढून नापिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. आता तेथील नापिक जमीन सुपीक झाली असून ज्वारी व तुरीचे चांगले उत्पादन होत आहे.'' 

कार्यक्रमात काठमांडू येथे झालेल्या जागतिक थ्रोबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या अरुजा कांबळे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे उपस्थित होते. विजयकुमार सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय प्रमोद जोशी यांनी करून दिला. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी आभार मानले. 

सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिलेल्या टिप्स... 
- स्वतःचे मत असणाऱ्यांना जग मान देते 
- हे मत तयार होण्यासाठी वाचन करणे गरजेचे 
- व्यक्तिमत्त्व फुलविण्यासाठी ग्रुप डिस्कशन व्हायला हवे 
- जग मोठे आहे, एकाच विश्‍वात अडकून पडू नका 
- बदल एका दिवसात घडत नाही, सतत प्रयत्न करायला हवे 

अनिता माळगे यांनी दिलेल्या टिप्स... 
- एकत्र येणे ही यशाची पहिली पायरी 
- स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज 
- प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळ्या प्रकारचे ज्ञान असते 
- फक्त त्याचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा 
- विश्‍वास असल्यास आपणही उद्योजिका होऊ शकतो 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com