भाजप-राष्ट्रवादीचे दावे-प्रतिदावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सोलापूर - जिल्ह्यातील 183 ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमच्याच पक्षाचे जादा सरपंच निवडून आले असल्याचे दावे-प्रतिदावे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहेत. यंदा झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही तालुक्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसून येते. 

सोलापूर - जिल्ह्यातील 183 ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमच्याच पक्षाचे जादा सरपंच निवडून आले असल्याचे दावे-प्रतिदावे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहेत. यंदा झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही तालुक्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसून येते. 

सोलापूर शहराला लागून असलेल्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यामध्ये भाजपने मिळविलेले यश लक्षणीय मानले जात आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघामध्ये त्यांनी 17 पैकी 13 ग्रामपंचायती जिंकण्यात यश मिळविले आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातही स्वबळावर दोन ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिरकाव केला आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपने तर 13 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. सांगोला तालुक्‍यात शेकापने बाजी मारली आहे. माढा तालुक्‍यात संमिश्र यश मिळाले आहे. मोहोळ तालुक्‍यात एका ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे यांनी केला आहे. तर 10 पैकी प्रत्येक पाच ग्रामपंचायती आमच्या गटाला मिळाल्याचा दावा माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या गटांनी केला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात आमदार भारत भालके गटाने बाजी मारली आहे. माळशिरस तालुक्‍यात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे उत्तम जानकर यांनी आपल्यालाच जादा ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा केला आहे. या तालुक्‍यात मोहिते-पाटील यांच्याविरोधात कौल असल्याचे बोलले जाते. पंढरपूर तालुक्‍यात आमदार प्रशांत परिचारक यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे. 10 पैकी सात ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांच्या गटाने केला आहे. करमाळा तालुक्‍यात आमदार नारायण पाटील, माजी आमदार श्‍यामल बागल यांनी आम्हालाच जादा ग्रामपंचायती मिळाल्याचे सांगितले आहे. या तालुक्‍यात माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटानेही काही ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. बार्शी तालुक्‍यात 50 टक्के ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटांनी केला आहे. 

"दक्षिण'मध्ये सहकारमंत्री जोरात 
अक्कलकोटमध्ये आमदार म्हेत्रे यांचा जादा जागा जिंकल्याचा दावा 
माळशिरसमध्ये भाजपचे उत्तम जानकर यांचा मुलगा व पत्नीही झाले सरपंच 
तुंगत येथे प्रकाश पाटील यांच्या गटाचा पराभव 
पंढरपूर तालुक्‍यात आमदार परिचारक यांच्या गटाची बाजी 
रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे वैशाली गरड एक हजार 369 मताधिक्‍याने विजयी 
माळशिरसमध्ये मोहिते-पाटील विरोधकांना मिळाले बळ 
माढ्यात मतदारांनी जुन्यांना नाकारले 

शहाजी पवार 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 56 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी भाजपचे उमेदवारी विजयी झाले आहेत. याशिवाय आघाडी करून निवडणूक लढविलेले सरपंच वेगळे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळविलेले हे यश लक्षणीय आहे. नांदेडच्या निवडणुकीवरून मोदी लाट संपली असे नाही. मोदी, फडणवीस हे लोकांच्या हृदयामध्ये असल्याचे हा निकाल सांगतो. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वबळावर 70 सरपंच निवडून आले आहेत. सात ठिकाणी आमच्याशी आघाडी केलेल्यांचे सरपंच निवडून आले आहेत. सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे या निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे. नव्या जोमाने पुन्हा कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 
- दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस