सोलापूरकडे पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम आला धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मात्र, कालपासून काही तालुक्‍यात तुरळक पाऊस झाल्याने त्या तालुक्‍यातील पिकांना जीवदान मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम आला धोक्‍यात

सोलापूर: राज्यात सगळीकडेच धो-धो पाऊस पडत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. खरिपाची चांगली पेरणी झाली असून पाऊस नसल्याने ती वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून पाऊसच न पडल्याने उगवून आलेली पिके धोक्‍यात आली आहेत. दररोज ढगांची गर्दी होत असूनही पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाने निर्धारित केलेल्या क्षेत्रापेक्षा 200 टक्के पेरणी झाली आहे. खरिपाच्या पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, आता पाऊस नसल्याने ती पिके धोक्‍यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी जवळपास 150 मिलिमीटर पाऊस हा जूनच्या पहिल्या आठवड्यात झाला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाऊस पडणे गरजेचे आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :