अहल्यादेवींच्या अर्थ, जलनितीतील ग्रामविकासाची दूरदृष्टी

वडकी (जि. पुणे) येथील होळकर तलाव अहल्यादेवी होळकर यांनी या तलावाची उभारणी केली.
वडकी (जि. पुणे) येथील होळकर तलाव अहल्यादेवी होळकर यांनी या तलावाची उभारणी केली.

सोलापूर - महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असेच होते. त्यामुळेच त्यांनी त्या काळात आखलेली जलनिती असो की अर्थनिती; आजच्या ग्रामविकासासाठी पुरेपूर फायदेशीर ठरू पाहतेय. तलाव, विहिरी आणि बारव खोदणे असो, नद्यांवर घाट बांधणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, अपंग, वंचितांचे पुनर्वसन करण्यापर्यंत ते अगदी पशुपालकांसाठी कुरणे सुरक्षित ठेवून निसर्गसंवर्धनाचा प्रयत्न करणे असो, या प्रत्येक कामात अहल्यादेवींची दूरदृष्टी दिसून येते.

व्यक्तिगत जीवनात अनेक संकटांना तोंड देत सुमारे 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार केला; पण या सगळ्या कारभारात त्यांनी स्वतःची अशी अर्थनिती आणि जलनिती ठरवली. महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण अहल्यादेवींनी घालून दिले.

राजकारण, समाजकारण याही पुढे जाऊन त्यांनी हे नेतृत्व केले; पण तोच पुढे सर्वंकष विकासाचा पाया मजबूत करण्यास कारण ठरले. त्यामुळेच त्यांचे कार्य विशिष्ट पट्टीत मोजमाप करता येत नाही.

त्यांच्या काळात अर्थव्यवस्थेचे दोन भाग होते. एक खासगी आणि दुसरा सरकारी. खासगी व्यवहार त्या स्वतः पाहत आणि सरकारी व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाहत, यावरून पैशाच्या विनियोगाचा त्यांचा विचार किती सुस्पष्ट होता, हे लक्षात येते. सरकारी पैसा त्यांनी योग्य कामासाठी, लोकांच्या सोईसुविधांसाठी कारणी लावला; पण त्यातही त्यांनी स्वतःच्या खासगी व्यवहारातील पैसाही धर्मशाळा, नद्यांवर घाट, विहिरी आणि बारव खोदण्यासाठी उपयोगी आणला. एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्या काळात त्यांच्या दरबारातील काही अधिकाऱ्यांना त्यांनी पैशाचा विनीयोग करण्याबाबत खास प्रशिक्षण दिले होते, त्यांची अर्थनिती या पद्धतीची लोकोपयोगी आणि पारदर्शी होती.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच आदिवासी, भिल्ल आणि भूमिहीन शेतमजुरांना माळरान, पडीक जमिनी कसावयास देऊन त्यांना त्यांच्या जगण्याचे साधन देताना, अन्नधान्य उत्पादनवाढीचा त्यांनी प्रयत्न केला. शिवाय कसण्यास दिलेल्या या जमिनीत शेतकऱ्यांनी 20 फळझाडे लावावीत, त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची, असे सूत्र ठरवले होते. त्यातून शेतीसाठीची वेगळी प्रेरणा त्यांनी त्या काळी शेतकऱ्यांना दिलीच; पण उत्पन्नवाढीचा प्रोत्साहनाचा वेगळा मार्गही शिकवला. अहल्यादेवींच्या जलनितीमध्येही अर्थनितीप्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्या काळी फडपद्धतीने पाणीवाटपावर अहल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. कायमस्वरूपी बागायत आणि हंगामी अशा पद्धतीने दोन विभाग करुन त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाणीवाटप केले. पाटाने पाणी देण्याच्या या पद्धतीत थेट शेतकऱ्यांना सहभागी करून घेतल्याने पाण्याची गरज आणि वापर याचा उत्तम मेळ बसला. जादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्नवाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला; पण शेतकऱ्यांकडून उत्पन्नाएवढाच सारा वसूल केला. शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होतेच; पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागांत विहिरी, बारव, आड, घाट यांसारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या. त्यापैकी बहुतांश विहिरी, बारवे आजही सुस्थितीत आहेत. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी होती. आज पैसा आणि पाण्याचे महत्त्व वाढलेले आहे; पण फार पूर्वीच या दोन्हीचे महत्त्व आणि त्यांच्या वापराचे सूत्र अहल्यादेवींनी जाणले होते, हे इथे महत्त्वाचे आहे.

जुन्या रूढी-परंपरांना विरोध
ग्रामविकास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अधिकार अहल्यादेवी सर्वस्वी मान्य करत, तर चुकीचे काम करणाऱ्याला बजावत, गाव आणि ग्रामस्थांची सुरक्षा याला त्या महत्त्व देत. ग्रामव्यवस्थेची घडी त्यांनी चांगली बसवली होती, त्यासाठी गावाच्या चौकीदारीची व्यवस्था त्यांच्या काळात होती. गावोगावी न्याय देणारे पंचाधिधिकारी नेमले. राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला. सती जाणे, बालविवाह, हुंडा घेणे यासारख्या परंपरा त्यांनी तेव्हाच मोडीत काढल्या.

ग्रामविकासाला सर्वंकष दिशा
"जलयुक्त शिवारा'च्या माध्यमातून आज पाणी अडवण्याची योजना असो की पाटाने पाणी देण्यात पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवणे असो, यासंबंधीचे काम पूर्वीच अहल्यादेवींनी करून दाखवले आहे. शिवाय आजची शतकोटी वृक्षलागवडीसारखी योजना असो, अहल्यादेवींनी त्या काळात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीच्या आखलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. ग्रामविकासाला सर्वंकष दिशा देण्याचे धोरण त्यांनी त्या काळात केले.

अहल्यादेवींबाबत काय, किती आणि कोणत्या मुद्द्यांवर बोलावं, एवढं अलौकिक कार्य त्यांनी त्या काळात केलं आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबद्ध कारभार करणाऱ्या त्या रणरागिनी होत्या, प्रचंड आत्मविश्‍वास, धाडस, दूरदृष्टी, त्यागी वृत्ती, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. शेतकरी, कष्टकरी, गरीब, उपेक्षित या वर्गाच्या विकासासाठी त्यांना असलेली आस आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कार्य करण्यात त्यांना असलेला रस, त्यांच्यातील लोकांप्रती असलेली ऊर्मी दाखवून देतो.
- सुभेदार बाबूराव पेठकर, अभ्यासक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com