धार्मिक फ्रेम खरेदीची धूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

सोलापूर - रमजान महिन्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जाते. घरामध्ये लावण्यासाठी असणाऱ्या धार्मिक फ्रेम खरेदीतही वाढ होते. या फ्रेममुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होत असल्याने खरेदीत वाढ झाली आहे. यामुळे फ्रेम विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकप्रकारे धार्मिक फ्रेम खरेदीची धूमच या दिवसात असते. 

रमजान महिन्यात खरेदीवर विशेष लक्ष दिले जाते. या महिन्यात जकात, नमाज तसेच अन्य साहित्य खरेदीची लगबग आता प्रत्येक घरामधून पाहायला मिळत आहे. कोणी तसबी (जपकऱ्यासाठी माळ), जहाँनमाज, अत्तर, रोजा सोडण्यासाठी लागणारी फळे, खजूर तसेच अन्य पदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ईदच्या दिवशी मित्र, नातेवाईक व अन्य सहकाऱ्यांना शिरखुर्मा पिण्यासाठी बोलावले जाते. या खास दिवशी आपले घर सुंदर आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी धार्मिक फ्रेम खरेदी केल्या जातात. यात काबेचे दार, मक्‍का आणि मदिनेचे फोटो, बरेलीचे संपूर्ण साहित्य, तोगरे आणि आयत असलेली फ्रेम बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे.  

फळांची वाढली मागणी 
रमजानचे रोजे सोडताना सायंकाळी खजूर आणि फळे खाल्ली जातात. त्यामुळे बाजारपेठेत फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यापैकी कलिंगड, खरबूज, पपई आदी स्थानिक फळांना जास्त पसंती आहे. सध्या बाजारपेठेत कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबे, सफरचंद, संत्रा आदी फळे आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. ही फळे मार्केटसह काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला फळांची ट्रॉली लावूनच फळे विकली जात आहेत. उपवास सोडताना फळांना पसंती असते म्हणून सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मार्केटमध्ये मुस्लिम बांधवांची एकच गर्दी असते. 

साधारण अन्य महिन्यात दोन ते तीन फ्रेम विक्री होते. परंतु, रमजान महिन्यात शेवटच्या टप्प्यात ३० ते ४० फ्रेमची विक्री दररोज होते. त्यामुळे रमजान महिना आला की फ्रेम विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. 
- महेबूब शेख, फ्रेम विक्रेता, सोलापूर