सुरक्षेसाठी आता क्‍यूआर कोडचा वापर 

शीतलकुमार कांबळे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

शहरातील सुरक्षा आणखी चांगली करण्याच्या दृष्टिकोनातून हे क्‍यू आर कोड स्टिकर लावण्यात येणार आहेत. स्मार्टफोनच्या वापरामुळे कमीत कमी वेळेत पोलिसांची मदत मिळविणे यामुळे सोपे होणार आहे. सध्या याबाबत प्राथमिक स्तरावर चाचणी सुरू आहे. 
- पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त (गुन्हे) 

सोलापूर - रिक्षामधील प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातून रिक्षांमध्ये आता क्विक रिस्पॉन्स (क्‍यू आर) कोड स्टिकरचा वापर करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. शहर पोलिसांकडून याबाबत चाचणी सुरू असून लवकरच शहरात याची अंमलबजावणी होणार आहे. 

रिक्षा चालक बसण्याच्या मागील बाजूस आणि प्रवासाच्या समोर क्‍यूआर कोड स्टिकर लावण्यात येणार आहे. या क्‍यूआर कोडमध्ये रिक्षाच्या मालकाची पूर्ण माहिती असणार आहे. यात रिक्षा मालकाचे नाव, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे. ऍड्रॉईड स्मार्ट फोनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण असे एक ऍप पुरविण्यात येणार आहे. जे प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. प्रवासी आपल्या मोबाईलमधील ऍप उघडून क्‍यू आर कोड स्कॅन करू शकतो. रिक्षातून प्रवास करताना तातडीच्या किंवा संकटावेळी याचा वापर करता येणार आहे. स्मार्ट फोन व ऍपच्या साह्याने क्‍यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना काही क्षणात मिळू शकेल. 

क्‍यू आर कोड म्हणजे काय 
क्विक रिस्पॉन्स कोड या शब्दाचे संक्षिप्त रूप हे क्‍यूआर कोड आहे. याचा उपयोग स्मार्ट फोनवर विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी केला जातो. क्‍यूआर कोडमध्ये एखादे उत्पादन तयार झालेली तारीख, एक्‍स्पायरी डेट आदी माहिती सुद्धा स्टोअर केलेली असते. विविध प्रकारच्या वस्तूवर क्‍यू आर कोड असतो. क्‍यू आर कोड वाचण्यासाठी क्‍यू आर कोड रीडर ऍपचा वापर करण्यात येतो.