कामाचे मेरिट दाखवून टीका करावी - राहुल वर्दा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी खासदारांनी कामाचे मेरिट करावे व मगच टीका करावी. सात-आठ महिन्यांपासून महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल वर्दा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

खासदार बनसोडे यांनी शिंदे यांच्यावर टीका केल्याचे वृत्त आजच्या "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याची दखल घेत वर्दा यांनी पत्रक काढून महापालिकेत भोंगळ कारभार सुधारण्याचे आवाहन खासदार बनसोडे यांना केले आहे. गेल्या 40 वर्षांच्या काळात शिंदे यांनी जेवढा विकास केला तो सगळ्यांना माहीत आहे. मेडिकल कॉलेज, सोलापूर विद्यापीठ, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सध्याचे विमानतळ, सोलापूर-पुणे व सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे चौपदरीकरण, उजनी पाइपलाइन ही कामे शिंदे यांनी केली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांनी सोलापूरला खूप आश्‍वासने दिली होती. त्यापैकी एक तरी पूर्ण झाले आहे का? असा सवाल वर्दा यांनी खासदार बनसोडे यांना विचारला आहे.

खासदार बनसोडे यांनी कोणती ठळक कामे केली ती सांगावीत. तुम्ही खासदार झाला म्हणून सोलापूरचा स्मार्टसिटीमध्ये समावेश झाला असे समजू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. यापुढील काळात विकासाबद्दल बोलावे व ते करून त्या कामाचे मेरिट दाखवावे मगच शिंदे यांच्यावर टीका करावी, असेही वर्दा यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.