अतिक्रमण अन्‌ रस्त्यावरून भ्रमण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सोलापूर - अशोक पोलिस चौकी, मार्कंडेय उद्यान, विव्हको प्रोसेस, वालचंद कॉलेजचे विविध विभाग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक अशा विविध संस्था व रहदारी असलेल्या या रस्त्यावरील जड व भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यात पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करण्यापलीकडे काही इलाज नाही.

अशोक पोलिस चौकीसमोरील मार्कंडेय उद्यानात येणारे आबालवृद्ध, वालचंद व गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निकचे विद्यार्थी, एमआयडीसीला कामासाठी जाणारे कामगार, शाळकरी मुले, विडी महिला कामगार, बॅंकांसाठी येणारे अशा अनेक पादचाऱ्यांना येथील महामार्गावरील जड वाहने, भरधाव दुचाकी व चारचाकी वाहनांना चुकवत वाट काढावी लागते. त्यात मार्कंडेय उद्यान परिसरातील पदपथांचा वापर वाहन पार्किंग, भेळ, चायनीजवाल्यांच्या व्यवसायासाठी झाल्याचे दिसून येते. भेळ, चायनीजसाठी ग्राहकांची रस्त्यावरच गर्दी व त्यात भरधाव वाहने यामध्ये पादचारी मात्र भरडला जात आहे. विव्हको प्रोसेस चौकात तर रस्ता ओलांडणे व पदपथ गाठणे धोकादायक बनले आहे. या चौकात अपघातही झाले तरी पदपथ मात्र मोकळे होताना दिसत नाहीत. शांती चौकात रिक्षावाल्यांचा रस्त्यावरच अनधिकृत थांबा असून, येथे पोलिस प्रशासन त्यांना रोखत नाही किंवा पादचाऱ्यांसाठी काही उपाययोजना होताना दिसून येत नाहीत.

शांती चौकातील वाहनांच्या गराड्यात जेथे वाहनांनाच मार्ग मिळत नाही, तेथे पदपथांवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किलीचे झाले आहे. अशी परिस्थिती येथेच नाही तर शहरात सर्वत्र आहे. पादचारी कर भरत नसल्याने कदाचित त्यांच्या समस्येकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाहीत.
- श्रीनिवास दोंतुल, पादचारी