अक्कलकोट येथे एसटी संपाने प्रवाशांचे हाल; ४०३ कर्मचारी संपावर

राजशेखर चौधरी
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

आज अक्कलकोट आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संपाबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.संपावर जाऊन ऐन दिवाळीत गैरसोय होऊन
प्रवाशांना अडचणीत न धरता कामावर हजर व्हावे असे आवाहन केले होते पण त्यांनी प्रतिसाद न देता संपावर गेले आहेत. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान व प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.
- विवेक हिप्पळगांवकर, आगार प्रमुख अक्कलकोट

अक्कलकोट : अक्कलकोट आगारातील एकूण वाहक, चालक, कंट्रोलर आणि तांत्रिक विभागातील असे ४०३ कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यामुळे अक्कलकोट एसटी स्थानकात संप माहित नसलेले प्रवाशी येत असून त्यांना या ठिकाणी आल्यावर याबाबत माहिती मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय व गावाला जाण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे.

प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सध्या सुट्या आहेत. इतरांनाही सुट्ट्या आहेत त्यामुळे समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. ऐन दिवाळी सणात कर्मचाऱ्यांनी उपसलेल्या संपाच्या हत्याराबाबत प्रवाशांत मात्र नाराजीची भावना दिसत आहे. दिवाळीत महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट यामुळे होणार आहे. मग त्यांना पगारवाढ महामंडळ नुकसान झाल्यानंतर कुठून देणार ही भावना व्यक्त करीत आहेत. अक्कलकोट आगारातील १५२ चालक, १८६ वाहक, १८ वाहतूक नियंत्रक आणि तांत्रिक कर्मचारी असे ४०३ कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतन वाढीच्या दर चार वर्षांनी होणाऱ्या करार वेतन वाढीसाठी आणि इतर न्याय मागण्यासाठी संपावर जात असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाचे अध्यक्ष बाबुराव फुलारी आणि इंटकचे अध्यक्ष राहुल स्वामी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

१ एप्रिल २०१६ पासून सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील मिळणाऱ्या वेतनश्रेणी, वेतन,विविध भत्ते व सेवा सवलती लागू करण्यात याव्यात यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आता सणासुदीच्या दिवसात प्रवास कसा करायचा याची अडचण नागरिकांसमोर असणार आहे.