राज्य सहकारी बॅंकेने स्वीकारले सोलापूरच्या विकासाचे पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सहकारमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; प्रादेशिक कार्यालयही होणार

सहकारमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; प्रादेशिक कार्यालयही होणार
सोलापूर - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक आता नफ्यात आली आहे. या बॅंकेने सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, उद्योगाला आर्थिक ताकद द्यावी, सोलापूरमध्ये राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. त्यांच्या या दोन्ही अपेक्षा बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी मान्य करत सोलापूरला राज्य बॅंकेने दत्तक घेतल्याची घोषणा व येथे राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे आश्‍वासन दिले.

राज्य सहकारी बॅंकेच्या शाखेच्या उद्‌घाटनानमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार भारत भालके, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, राज्य सहकारी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड व बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, 'गावातील विविध सेवा सहकारी संस्थांनी त्यांच्या गावातील रहिवासी आणि खातेदारांना सभासद करून घ्यावे. सोसायटीने गावातील पैसा गावातच गुंतवावा. गावाचा ब्रॅंड करून उद्योग, शेतीच्या माध्यमातून गावाची ओळख निर्माण करावी.''

डॉ. सुखदेवे म्हणाले, 'राज्य बॅंकेचे ब्रॅंडिंग करून विस्तारीकरण करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकांच्या कामगिरीमुळे राज्य बॅंकेने देशभरात चांगली कामगिरी केली आहे. आता अडचणीत आलेल्या जिल्हा बॅंकांना उभारी देण्यासाठी राज्य बॅंक निश्‍चित मदत करेल; मात्र त्यासाठी जिल्हा बॅंकांनी शिस्त लावून घेणे आवश्‍यक आहे.''