आधार कार्ड काढण्यात विद्यार्थ्यांना अडचणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सोलापूर - शासनाने चालू शैक्षणिक वर्षामध्ये संचमान्यता करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केले आहे. आधार कार्ड जेवढ्या विद्यार्थ्यांचे आहेत, तेवढ्या विद्यार्थ्यांवरच संचमान्यता केली जाणार असल्याने मोठा गोंधळ उडणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये संचमान्यतेसाठी आधार कार्डची सक्ती करण्याची घातलेली अट शिथिल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

ग्रामीण भागामध्ये अद्यापही बहुसंख्य विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळालेले नाही. महा ई-सेवा केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सुविधा गेल्या दोन महिन्यांपासून उपलब्ध नाही. ग्रामीण भागामध्ये सुविधाच उपलब्ध नसल्याने आधार कार्ड नेमके काढायचे कुठून, असा प्रश्‍न पालकांसमोर उपस्थित झाला आहे. तर, शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केले आहे. शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास विद्यार्थी शाळेत नियमित असूनही त्याची गणना पटामध्ये केली जाणार नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.