पाच दिवसात दीड हजार फोन 

संतोष सिरसट
बुधवार, 21 जून 2017

माझा मोबाईल क्रमांक 15 जूनला राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुला केला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास दीड हजार लोकांनी संपर्क साधला आहे. त्या शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी फोन करत असल्याने तो क्रमांक बंद किंवा व्यस्त असल्याचे सांगतो. त्यावर मात करण्यासाठी दुसरी हेल्पलाइन सुरू केली आहे. दिवसाला जवळपास 300 शेतकऱ्यांशी संपर्क होतो. त्यांची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. 
सुभाष देशमुख, सहकारमंत्री

सोलापूर - सहकारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफी संदर्भात जाहीर कार्यक्रमाद्वारे त्याचबरोबर सोशल मिडियाव्दारे आपला मोबाईल क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी दूरध्वनी केले आहेत. एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी दूरध्वनी करत असल्यामुळे तो क्रमांक सततच्या फोनमुळे व्यस्त असल्याचे दिसून येते. 

हा क्रमांक सतत व्यस्त असतो. त्यामुळे पणन मंडळाच्यावतीने दुसरी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यांच्या 18002330244 या क्रमांकावरही शेतकरी आपल्या शंका विचारू शकतात. बॅंकांच्या संदर्भात त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या या हेल्पलाइनवरुन विचारल्या जाऊ शकतात.