सोलापूरच्या ऊसदराची कोंडी रविवारी फुटण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसाची कोंडी फुटल्याशिवाय कोणत्याही कारखान्यांना ऊस घालू नये. शेतकरी संघटनेच्यावतीने सुरू असलेले आंदोलन यापुढेही सुरूच राहील. ज्याप्रमाणे कारखानदार एक झाले आहेत, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनाही एक झाल्या आहेत. 
- दीपक भोसले, रयत क्रांती संघटना

सोलापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उसदराची कोंडी काल (रविवारी, ता. 5) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुटली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी रविवारी (ता. 12) किंवा सोमवारी (ता. 13) सुटण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

राज्यातील सर्वांत जास्त साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उसाची कोंडी अद्यापही फुटलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये ही कोंडी कायम असल्याने कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांची ऊस दराच्या प्रश्‍नावर एकी झाली आहे. काहीही झाले तरी आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. ज्याप्रमाणे कारखानदार एकत्र आले आहेत, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी एकत्र आल्या आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनाही एफआरपी व त्यावर 200 रुपये देण्याचा झालेला निर्णय मान्य झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाच्या दराबाबत काय निर्णय होतो याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोबत जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्या बैठकीत संघटनांनी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती सहकारमंत्री देशमुख यांच्याकडे केली. त्यांच्याबरोबर संघटनेची अर्धा तास चर्चा झाली. शेवटी सहकारमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून ऊस दराच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कारखानदारांची 12 किंवा 13 नोव्हेंबरला बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी पुढील आठवड्यात सुटण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री देशमुख यांच्याकडे झालेल्या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामूद पटेल, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, बळीराजाचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, विजय रणदिवे, सचिन पाटील, नवनाथ माने, उमाशंकर पाटील, माऊली जवळेकर, विश्रांती भुसनर, प्रताप गायकवाड उपस्थित होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :