बाहुबलीने मिळवून दिला ५४ लाखांचा कर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सोलापूर - ‘बाहुबली टू’ चित्रपटाने जगभरातील सिनेरसिकांना भुरळ घातली. या चित्रपटाने जगभरातून आतापर्यंत एक हजार ५०० कोटींहून अधिक रुपये कमविले आहेत. बाहुबली टू चित्रपटाने सोलापूरच्या करमणूक कर विभागालाही मालामाल केले आहे. एका महिन्यात या चित्रपटाने फक्त सोलापूर शहरातीलच चित्रपटगृहातून तब्बल ५४ लाख ३८ हजार रुपयांचा करमणूक कर मिळवून दिला आहे. 

सोलापूर जिल्हा प्रशासनाला यापूर्वी बाहुबली या चित्रपटातूनच मोठ्या प्रमाणावर करमणूक कर मिळाला होता. त्यानंतर ‘बाहुबली टू’ या चित्रपटाने करमणूक कर शाखेला मालामाल केले आहे. सोलापूर शहरात असलेल्या ११ चित्रपटगृहांतून हा ५४ लाख रुपयांचा कर मिळाला आहे. बिग सिनेमा चित्रपटाच्या दोन स्क्रिनमधून १४ लाख ३४ हजार रुपये, मीनाच्या तीन स्क्रिनमधून १८ लाख रुपये, उमामधून एक लाख ५३ हजार, भागवत चित्रपटगृहातून सात लाख ५५ हजार रुपये, गेंट्यालमधून १२ हजार, लक्ष्मी चित्रपटगृहाच्या दोन स्क्रिनमधून दोन लाख चाळीस हजार रुपये आणि प्रभात चित्रपटगृहातून नऊ लाख ९४ हजार रुपयांचा करमणूक कर जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बाहुबली टू चित्रपटाची क्रेझ कायम होती. जिल्ह्यात सध्या २८ चित्रपटगृहे असून त्यापैकी तीन बंद आहेत. २५ चित्रपटगृहातून ‘बाहुबली टू’ने मिळवून दिलेल्या करमणूक कराची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे.