उजनी धरणातून खरिपासाठी पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सोलापूर - यंदाच्या खरीप हंगामासाठी उजनी धरणातून गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सायंकाळी पाच वाजता धरणातून कालव्यात 400 क्‍सुसेक, तर बोगद्यात 100 क्‍सुसेकने पाणी सोडले जात होते. 

सोलापूर - यंदाच्या खरीप हंगामासाठी उजनी धरणातून गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सायंकाळी पाच वाजता धरणातून कालव्यात 400 क्‍सुसेक, तर बोगद्यात 100 क्‍सुसेकने पाणी सोडले जात होते. 

जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरी 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाचे आगमन झाले नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, आता पाऊसच नसल्याने उगवून आलेली पिके माना टाकू लागली आहेत. आता उजनीतून पाणी सोडल्यामुळे पिके वाचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. उजनीच्या लाभक्षेत्रातील तालुके वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्‍यामधील पिके पावसाअभावी संकटात सापडली आहेत. त्या पिकांना जीवदान देण्यासाठी येत्या तीन-चार दिवसात पाऊस येणे अपेक्षित आहे. 

पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरण 36 टक्‍क्‍यांपर्यंत भरले आहे. अद्यापही धरणामध्ये 12 हजार 351 क्‍सुसेकने पाणी येत आहे. त्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दुपारी एकच्या सुमारास कालव्यातून 150 क्‍युसेकने सुरू केलेला विसर्ग सायंकाळी पाच वाजता 400 क्‍युसेक केला होता. त्याचबरोबर दुपारी एक वाजता बोगद्यातून 50 क्‍सुसेकने सोडलेला विसर्ग दुपारी चार वाजता 100 क्‍सुसेक करण्यात आला आहे. कालव्यातून टप्याटप्याने साडेतीन ते चार हजार तर बोगद्यातून 900 क्‍सुसेकने पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे