राज्यात पहिल्यांदाच होणार 'व्हीव्हीपीएटी' यंत्राचा वापर 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नांदेड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होत आहे. या निवडणुकीत या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार आहे. त्यासाठी 350 यंत्रे खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी 92 लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. प्रती यंत्र 23 हजार 212 रुपये आणि प्रती निवडणूक यंत्राचा खर्च 3 हजार रुपये अशी तरतूद आहे. 

सोलापूर ; राज्यात पहिल्यांदाच नांदेड महापालिका निवडणुकीत "व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल-व्हीव्हीपीएटी' यंत्र वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी निवडणूक आयोगास अग्रीमही मंजूर केला आहे. या यंत्रामुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, त्याच्याच खात्यात ते पडले आहे याची खात्री मतदाराला आता होणार आहे. 

नांदेड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होत आहे. या निवडणुकीत या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार आहे. त्यासाठी 350 यंत्रे खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी 92 लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. प्रती यंत्र 23 हजार 212 रुपये आणि प्रती निवडणूक यंत्राचा खर्च 3 हजार रुपये अशी तरतूद आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे तसेच प्रलोभननुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी निर्णय घेतले जातात. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राच्या कार्यप्रणालीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या, त्यानुसार न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात "व्हीव्हीपीएटी' यंत्राचा वापर लोकसभा व विधानसभा निवडणुकांत करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अशा प्रकारच्या यंत्राचा वापर प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदाच होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारा निधी शासन उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर या यंत्राचा नियमित वापर करण्याचे धोरण निश्‍चित झाल्यास ते खरेदी करण्यासाठी संबंधित महापालिकेकडून खर्च घेतला जाणार आहे. या यंत्राच्या वापरामुळे महापालिका निवडणुकीतील यंत्राबाबत जनसामान्यांच्या मनातील संशय दूर होण्यास मदत होईल, असा शासनाचा दावा आहे. 

Web Title: Solapur news VVPAT machine use in election