अत्याचार प्रकरणी पोलिसांसमोर शिक्षकास महिलेने दिला चोप

सुदर्शन हांडे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून पीडित महिला व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता भलताच प्रकार पुढे आला. प्रारंभी पीडित महिलेने शिक्षकावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. तर शिक्षकाने आपण असे कोणतेही कृत्य केलेले नसून सदर महिलाच माझ्या मागे लागली असल्याचे सांगितले. दोन्ही कडील दावे ऐकून पोलिसांनी पीडित महिला व शिक्षक असे दोघांचे ही मोबाईल तपासले असता दोन्ही मोबाईलमध्ये एकमेकांचे अश्लील फोटो असल्याचे आढळले.

बार्शी : महिलेवर अत्याचार केल्या प्रकणी बार्शीतील एका जिल्हा परिषद शिक्षकास पोलिस ठाण्यात पोलीसांसमोर महिलेने चांगलाच चोप दिला. पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन ही मंगळवारी रात्री या प्रकणावर अर्थपूर्ण पडदा टाकण्यात आला. 

या बाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही या जिल्हा परिषद शिक्षकाच्या घराजवळ राहते. आपल्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप करत पीडित महिला व तिच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकांच्या घरी जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेचा आणि तीच्या नातेवाईकांचा पवित्रा पाहून शिक्षकाने तेथून पळ काढत बार्शी पोलिस स्टेशन गाठले. घाबरलेल्या शिक्षकाला पोलिसांनी पिण्यासाठी पाणी देऊन शांतपणे अधिक माहिती विचारली. तेवढ्यात पीडित महिला व तिचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. त्या ठिकाणी पोलिसांच्या समक्षच पीडितेने शिक्षकास चांगलाच चोप दिला. घडला प्रकार पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला. 

पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून पीडित महिला व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता भलताच प्रकार पुढे आला. प्रारंभी पीडित महिलेने शिक्षकावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. तर शिक्षकाने आपण असे कोणतेही कृत्य केलेले नसून सदर महिलाच माझ्या मागे लागली असल्याचे सांगितले. दोन्ही कडील दावे ऐकून पोलिसांनी पीडित महिला व शिक्षक असे दोघांचे ही मोबाईल तपासले असता दोन्ही मोबाईलमध्ये एकमेकांचे अश्लील फोटो असल्याचे आढळले. पोलिसांनी दोघांच्या मोबाईल मधील असलेल्या फोटो बद्दल नातेवाईकांना सांगताच खरा प्रकार ऐकून पीडित महिलेची बहीण पोलिसांना समोरच चक्कर येऊन पडली. 

त्या महिलेनेच माझ्या घरात जबरदस्तीने घुसून माझे फोटो काढले असल्याचा दावा जिल्हापरिषद शिक्षकाने पोलिसांसमोर केला. तर पीडित महिलेने काय भूमिका मांडली हे समजू शकले नाही. मंगळवारी रात्री साडे आठ पासून पोलिस स्टेशनमध्ये सुरू असलेला हे नाट्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. चक्क पोलिसांसमोर पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा परिषद शिक्षकाला चोप देऊन भयानक प्रकार पुढे येऊन ही पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता घडल्या प्रकारावर अर्थपूर्ण पडदा टाकला असल्याची चर्चा आहे. सदर शिक्षकाचा जिल्हा परिषदेत बराच काळ वावर होता. सध्या हा शिक्षक बार्शी पंचायत समिती कार्यालयातही सतत दिसून येतो. घडल्या प्रकाराने त्या शिक्षकाची चांगलीच पाचावर धारण बसली.