बार्शी : कांदलगांवमधील युवक पोहताना बुडून बेपत्ता

सुदर्शन हांडे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मागील पंधरा दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या पावसाने कांदलगांव येथून वाहणाऱ्या चांदणी नदीला पूर आला होता. दोन दिवसानंतर हे पाणी आेसरले असले तरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जलयुक्तच्या कामामुळे नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीला पाणी आल्याने व आज सुट्टीचा दिवस असल्याने युवकांना पोहण्याचा मोह आवरला नाही. बंधाऱ्याशेजारी पोहण्यासाठी ८-९ युवक पाण्यात उतरले.

बार्शी : दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक पाण्याच्या भोवऱ्यात सापडून बेपत्ता झाला. रात्री उशीरापर्यंत गावातील तरूणांनी शोधकार्य करूनही त्याचा शोध लागू शकला नाही. श्रीकांत उर्फ पप्पू युवराज नवले (वय २४ रा. कांदलगांव ता. बार्शी )असे बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचे नांव आहे. दुपारी तीन च्या सुमारास ही घटना घडली. नवले कुटूंबियावर कोसळलेल्या या आपत्तीमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक शोधकार्या साठी उशिरापर्यंत पोहोचलेले नव्हते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र फेल झाल्याचे दिसून आले. 

मागील पंधरा दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या पावसाने कांदलगांव येथून वाहणाऱ्या चांदणी नदीला पूर आला होता. दोन दिवसानंतर हे पाणी आेसरले असले तरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जलयुक्तच्या कामामुळे नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीला पाणी आल्याने व आज सुट्टीचा दिवस असल्याने युवकांना पोहण्याचा मोह आवरला नाही. बंधाऱ्याशेजारी पोहण्यासाठी ८-९ युवक पाण्यात उतरले.

बंधाऱ्याच्या भिंतीवरून जोरात पाणी खाली कोसळत होते. उकळी मारून पाणी उसळत होते त्यामुळे तेथे पाण्याचा भोवरा होत होता. युवकांनी पोहण्यासाठी पाण्यात उडया मारल्यानंतर कांहीजण या भोवऱ्यात अडकले. कांही जण त्यातून मोठया मुश्किलीने बाहेर आले परंतु श्रीकांत मात्र भोवऱ्यात अडकून बुडाला तो बाहेर आलाच नाही. तो बाहेर येत नसल्याचे पाहून सोबतच्या युवकांनी लगेच शोधाशोध सुरू केली. नदीपात्रात सर्वत्र शोध सुरू होता. वाकडी येथील नावेतून हिंगणगांव पर्यंत नदीपात्रात शोध घेतला परंतु रात्री उशीरापर्यंत शोध लागला नाही. 

उपसरपंच प्रदीप नवले यांनी पांगरी पोलीसांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक ढोणे यांनी सुटीवर असतानाही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देवून देऊन सूचना दिल्या. रात्री तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी कांदलगाव येथे जाऊन विचारपूस केली. 

श्रीकांत हा बार्शीत काम करून कुटूंबाला हातभार लावत असे. आज सुटीचा दिवस असल्याने दुपारीच तो गावाकडे गेला होता. युवकांसोबत पोहण्यास गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. 

पाण्याच्या भोवऱ्याशेजारी पोहण्याचा छंद घातकच
बार्शी शहर व तालुक्यात जलयुक्तची अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे होऊन गावोगावी बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधाऱ्यात अथवा बंधाऱ्याशेजारी पाण्याच्या प्रवाहाला वेग असेल तर मोठा भोवरा होतो. पोहायला येत असेल तरी भोवऱ्यात सापडल्यानंतर पट्टीच्या पोहणाराचा देखील निभाव लागत नाही. तसेच बंधाऱ्यात गाळ असेल तर उडी मारल्यानंतर गाळात रुतून बसण्याचाही धोका असतो. बार्शी शहारानजीक वाघमारे वस्ती येथील मुलींचा वर्षभरापूर्वी बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. इतर ठिकाणीही दुर्घटना घडल्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी पोहण्याचा मोह घातकच आहे. युवकांनी व पालकांनी याची काळजी घ्यायला हवी.