भाजप महामेळाव्यासाठीची सोलापूर ट्रेन लेट

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबईत होणाऱ्या भाजप महामेळाव्याला जाण्यासाठी सोलापुरातून दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी सोलापूरहून जाणारी विशेष ट्रेन लेट सुटणार आहे.

सोलापूर - मुंबईत उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या मेळाव्यासाठी सोलापूरहून जाणारी विशेष ट्रेन लेट सुटणार आहे. गाडी उपलब्ध नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ट्रेन मुंबईकडे प्रस्थान करेल असे सांगण्यात आले. 

मुंबईत होणाऱ्या भाजप महामेळाव्याला जाण्यासाठी सोलापुरातून दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कार्यकर्ते जमविण्यासाठी प्रत्येक नगरसेवक कामाला लागले असून, जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभाग 14 मध्ये याच दिवशी पोटनिवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना सवलत देण्यात आली आहे. 

महापालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. त्यापैकी 26 नगरसेविका, तर 23 नगरसेवक आहेत. या शिवाय दोन स्वीकृत सदस्य आहेत. या प्रत्येकाने किमान 25 कार्यकर्ते तयार केले तर ही संख्या 1275 वर पोचणार आहे. काही प्रभावशील नगरसेवक 75 ते 100 कार्यकर्ते नेण्याचेही नियोजन केले आहे. त्यानुसार रेल्वेने जाण्याची तयारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र रेल्वे उपलब्ध नसल्याचा निरोप आला आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. अनेक कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर जमले होते, मात्र रेल्वे
दोन तास लेट असल्याचे कळाल्याने त्यांना आता प्रतिक्षा करावी लागली आहे. 

या महामेळाव्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली विशेष रेल्वे मुंबईत पोचल्यावर मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सीएसटी येथे विशेष बसची सुविधा आहे. 6 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता ही रेल्वे परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. कार्यकर्त्यांना रेल्वेतच अन्नाची पाकिटे देण्याची सोय करण्यात आली आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले.

विशेष रेल्वे उपलब्ध नसल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातून दुपारी देण्यात आली. त्यानुसार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला. दुपारी साडेचार वाजता प्लॅटफॅार्म क्रमांक एकवर विशेष रेल्वे येईल व तेथूनच ती रवाना होईल.
- प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Solapur Train schedule changed for BJP workers meeting at mumbai