सोलापूरला शुक्रवारपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाकडे केली जात होती. या विषयावरून गेल्या दहा दिवसांपासून चाललेल्या गदारोळ व राजकारणावर अखेर बुधवारी पडदा पडला. महापालिकेत झालेल्या बैठकीत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाकडे केली जात होती. या विषयावरून गेल्या दहा दिवसांपासून चाललेल्या गदारोळ व राजकारणावर अखेर बुधवारी पडदा पडला. महापालिकेत झालेल्या बैठकीत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कक्षात पाणीपुरवठ्याबाबत बैठक झाली. या वेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृहनेते संजय हेमगड्डी, राष्ट्रवादीचे गटनेते पद्माकर काळे, ज्येष्ठ नगरसेवक ॲड. यू. एन. बेरिया, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे, आयुक्‍त विजयकुमार काळम-पाटील, सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव, उपअभियंता राजकुमार रेड्डी, गंगाधर दुलंगे, संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते. 

बैठकांवर बैठका होऊनही सांगितलेली कामे होत नसल्यामुळे पदाधिकारी हे प्रशासनाचे वाभाडे काढत होते. नेहमी तांत्रिक मुद्दे सांगण्यापेक्षा आताचे नियोजन काय आहे ते सांगा, असा तगादाच पदाधिकाऱ्यांनी लावला होता. 
बजेटमध्ये कसल्याही प्रकारची कपात न करता म्हणेल तेव्हा पाणीपुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. असे असतानाही वितरणलाइन तसेच पाण्याच्या टाक्‍या भरत नाहीत, अशी उत्तरे प्रशासन देत असल्याचे सांगत श्री. बेरिया यांनी खंत व्यक्‍त केली. उपमहापौरांनी तर पाणी जादा होत असल्याने मोटारी बंद ठेवल्याची धक्‍कादायक माहिती दिली. दीड तास चर्चा करूनही प्रशासनाकडून नियोजनाबाबतचे ठोस उत्तर येत नसल्याचे पाहून महापौर संतप्त झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांना उठून बोलण्यास फर्मावले. कामच होत नसेल तर तसे सांगा आणि तसे लेखी लिहूनही द्या. मी ॲक्‍शन घेते. पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने किती बैठका घेतल्या व कोणत्या उपाययोजना केल्या हे सांगा. बैठकीत तुम्ही केवळ कागद समोर घेऊन बसता. औज बंधारा वाहून जाण्याला तुम्हीच जबाबदार आहात, असे महापौरांनी सुनावले.

दोन वर्षांपासून सांगूनही प्रशासनाच्या कार्यप्रणालीत फरक न पडल्याने पदाधिकारी संतप्त झाले होते. पदाधिकाऱ्यांचे रूप पाहून आयुक्‍तही निरुत्तर झाल्याचे दिसले. शहराला आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून काही ठिकाणी कमी दाबाने तसेच उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

विरोधक गैरहजर 
या विशेष बैठकीकडे विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, शिवसेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे यांनी पाठ फिरवली. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. त्याचप्रमाणे आमच्या पदाधिकारी, नगरसेवकांनाही बोलवायला हवे होते, अशा शब्दांत श्री. काळे यांनी नाराजी व्यक्त केली. उपलब्ध आहे म्हणून दररोज पाणीपुरवठा करू नये, असेही त्यांनी सांगितले.  

पुरवठ्यात दुजाभाव नको 
दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार असला तरी हद्दवाढ भागातील लोकांना रोटेशनप्रमाणे रात्री-अपरात्रीच पाणी सोडावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर, शहर आणि हद्दवाढ असा दुजाभाव करू नका. पाणीपुरवठा समप्रमाणात करा. निदान अकराच्या आत तरी हद्दवाढ भागास पाणीपुरवठा व्हावा, अशी सूचना महापौरांनी केली.

Web Title: solapur water supply