नववधूचे दागिने प्रवासात चोरीला; २४ तासांतच संशयित पोलिसांच्या तावडीत

बसवकल्याणचा प्रवासी पोटात दुखत असल्याचे सांगून सोलापुरात उतरला
 Bridal jewelry wedding day
Bridal jewelry wedding daysakal

सोलापूर : नववधूसोबत विवाहातील दागिने घेऊन जाताना मुंबई ते नळदुर्ग या प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील तब्बल साडेसोळा तोळे दागिने चोरून नेले. २१ जूनला विवाह असल्याने सर्वांचीच चिंता वाढली. बसचालकाने नळदुर्ग येथून बस परत फिरविली आणि फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. शहर गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत दिलीप ऊर्फ धनुष रामण्णा माने (रा. मंठाळ, ता. बसवकल्याण) याला जेरबंद करून त्याच्याकडून संपूर्ण दागिने जप्त केले.

मरीयम शेख या मुंबईतून जयभवानी ट्रॅव्हल्समधून हुमानाबाद येथे विवाहासाठी येत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची आई, भाऊ हेदेखील होते. भिगवण येथे ट्रॅव्हल्स थांबली आणि सर्वांनी जेवण केले. पहाटेची वेळ झाल्यानंतर बहुतेक प्रवासी झोपी गेले होते. ती संधी साधून मुंबई येथून बसवकल्याणला जाण्यासाठी बसमध्ये चढलेला प्रवासी सोलापूर येथे पोटात दुखत असल्याचे कारण सांगून उतरला. त्यानंतर बस पुढे निघाली आणि नळदुर्गजवळ आल्यानंतर ट्रॅव्हल्समधील एक महिला प्रवासी मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या आवाजाने मरीयम शेख यांच्यासह सर्वजण जागे झाले आणि त्यावेळी त्यांचीही पर्स नव्हती. हुमनाबाद येथे विवाहासाठी जाणाऱ्या नववधूची व्यथा ऐकून ट्रॅव्हल्सचा चालक मोहमद इस्माईल कुरेशी याने बस सोलापूरच्या दिशेने फिरवली. फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.

बसवकल्याणला जाणारा प्रवासी सोलापुरात का उतरला, वाटेत दुसरा कोणी प्रवासी उतरला का, याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी तो एकटाच प्रवासी वाटेत उतरल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी मुंबई येथील तिकीट बुकिंग कार्यालयातून त्या प्रवाशाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तपासाला नवी दिशा मिळाली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने त्या चोरट्याला पकडले. लिंगराज वल्याळ मैदानाजवळील सार्वजनिक रोडवर तो फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलिसांनी सापळा रचून त्याला शुक्रवारी (ता. १७) पकडले. त्याच्याकडून सर्व दागिने जप्त केले.

‘या’ पथकाची उल्लेखनीय कामगिरी

नववधूचे दागिने प्रवासात चोरणाऱ्याला जेरबंद करण्याची कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलिस हवालदार महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, तात्यासाहेब पाटील, कृष्णात कोळी, विद्यासागर मोहिते, वसीम शेख, प्रकाश गायकवाड, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, विजय वाळके, चालक महेंद्र ठोकळ यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com