वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तीन वेळा अपयश येऊन चौथ्या प्रयत्नात तहसीलदार

विशाल अरूण नाईकवाडे चौथ्या प्रयत्नात NT-C प्रवर्गातुन राज्यात प्रथम क्रमांकाने तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झाले
Vishal Arun Naikwade
Vishal Arun Naikwadesakal

उपळाई बुद्रूक : युपीएससीच्या मुख्य परिक्षेपर्यंत मजल मारली परंतु अपयश आल्याने, एमपीएससीत नशीब अजमावयाचे ठरवले. पण अपयश पाठ सोडायला तयार नव्हते. सलग तीन वेळा एमपीएससीत अपयश येऊन देखील. वडिलांचे प्रोत्साहन, प्रेरणा व पाठबळ यामुळे आलेली अपयश पचवुन नव्या उमेदीने परिक्षेला सामोरे जात चौथ्या प्रयत्नात NT-C प्रवर्गातुन राज्यात प्रथम क्रमांकाने तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झालेले उंदरगाव (ता.माढा) येथील विशाल अरूण नाईकवाडे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

घरची परिस्थिती मध्यमवर्गीयच, वडीलांनी कमवा व शिका योजनेतून तर कधी रोजगार हमी योजनेवर काम करून तत्कालिन कोल्हापूर विद्यापीठातून (सोलापूर) राज्यशास्त्र विषयात एम. ए पूर्ण केलं. बेताच्या परिस्थितीमुळे पुढे विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सचिव पदाची नोकरी पत्करली. प्रामाणिकपणे नेटाने नोकरी करत असताना त्यांनी चांगल्या संस्काराचे बाळकडू पाजले. शेतीपेक्षा आमच्या दोन्ही भावंडांच्या शिक्षणाकडे त्यांनी आवर्जुन विशेष लक्ष दिले व त्यासाठी आग्रही राहिले. चौथीपर्यंत घरी स्वाध्यायमाला, व्यवसायमाला पोस्टाने येत. ते स्वतः सोडवून घेत असत. गावातील काही पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना आमची शिकवणी घेण्यासाठी प्रयत्न करत. दर्जेदार शिक्षणासाठी अकलूज, लातूर पासून पुढे युपीएससीसाठी दिल्ली पर्यंत जाण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन, पाठिंबा आणि पाठबळ दिलं. त्यांच्या संस्कारामुळेच आज मोठा भाऊ डॉ विकास नाईकवाडे वैद्यकीय अधिकारी म्हणून तर मी सध्या तहसीलदार या पदावर काम करत आहे.

बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरला पूर्ण केल्यानंतर पुढे कृषी पदवी साठी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे प्रवेश घेतला. विद्यापीठात पोस्ट ग्रज्युएट मुलांमध्ये काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे वातावरण होते, स्पर्धा परीक्षा मंच कार्यरत होता. दरवर्षी विद्यापीठातून काही विद्यार्थी सिलेक्ट होत असत. परंतु पदवीच्या हॉस्टेल ला मारामाऱ्या, रॅगिंग आणि राडेच जास्त चालत. ज्याला डिग्री काढायला जितका जास्त काळ लागेल आणि हॉस्टेल ला ज्याचा जितके वर्ष मुक्काम त्याला त्या प्रमाणात मान मिळत असे. अशात लायब्ररीत दिसणारी जयकृष्ण फड आणि बाप्पासाहेब थोरात ही सिनियर अभ्यासू मंडळी एमपीएससीतून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. त्यांचा विद्यापीठातील सत्कारास संपूर्ण सभागृहाने उभे राहून अभिवादन केले. तो एक क्षण मनावर कायमचा कोरला गेला. अन् स्पर्धा परीक्षेची आवड अधिक निर्माण झाली.

पुढे पदवी परीक्षा संपल्या नंतर एम एस सी ऍग्री ला प्रवेश न घेता स्पर्धा परीक्षा तयारी साठी पुणे गाठले. या कामी वरीष्ठ मित्र अनिरुद्ध ढगे यांनी हाताला धरून पुण्यात आणले म्हणले तरी वावगे ठरणार नाही. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा परिवारात प्रवेश मिळाला. इथे डॉ विवेक कुलकर्णी व संचालिका डॉ सविता ताई यांची कडक शिस्त, आदरयुक्त भीती, प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याची क्षमता ओळखून त्यांना केलेले मार्गदर्शन, शनिवारची उपासना, सेवाभाव व समर्पित वृत्तीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महानुभवांची व्याख्याने, क्षेत्रभेटी याने आत्मविश्वास वाढत गेला. सुरवातीला युपीएससीच्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचून कुठे तरी कमी पडत असल्याचे जाणवल्यानंतर एमपीएससीकडे मोर्चा वळवला. एमपीएससी आणि फॉरेस्ट मुलाखतीत 3 वेळा अपयश आल्यानंतर मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली. काहीच नाही पासून सुरू झालेला प्रवास काहीतरी भेटलं इथपर्यंत येऊन पोहोचला होता परंतु मंत्रालयात काम करत असताना कुठेतरी एक सल होतीच की यासाठी आपण प्रयत्न करत नव्हतोच हा तर एक छोटासा विसावा आहे. त्यानंतर पुढील वर्षी MPSC तून NT-C प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला येऊन तहसीलदार पदी निवड झाली आणि क्षणभर वाटलं आपल्यासाठी सुध्दा auditorium मध्ये असेच लोक टाळ्या वाजवत उभे राहिलेत .घरी फोन करून ओल्या कापऱ्या आवाजात वडीलांना फोनवर ही बातमी सांगितली. तेंव्हा त्यांचा पण गळा दाटून आला होता. मागील 6 वर्षात पुण्यात सातत्यपूर्ण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश होतं असे तहसीलदार विशाल नाईकवाडे सांगतात....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com