बुद्धाचा अहिंसेचा मार्ग जगाला तारणहार

‘कॉफी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केल्या अभ्यासकांनी प्रतिक्रिया
Buddha purnima
Buddha purnimaesakal

जीवनात चांगले कर्म व चांगले विचार ठेवावेत

निसर्गाने दिलेल्या पाण्याच्या वादातून युद्धाची तयारी आणि याच युद्धाचा विरोध करून समता, बंधुता, स्वातंत्र्य तसेच शांतीचा मार्ग शोधून काढणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. उपलब्ध असणारे राजवैभव सोडून वनवास पत्करून मानवी जीवनातील दुःख, त्या दुःखाचे कारण निवारण्याचा मार्ग आणि स्वच्छ व शुद्ध पवित्र निर्मळ जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे आचरण कसे असावे याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले आहे. मानवा-मानवातील मोह, मत्सर, द्वेष, लोभ नष्ट होऊन संपूर्ण मानवजात सुखी राहण्यासाठी त्यांनी स्वतः अनुभव घेऊन मार्ग दिले. बुद्धत्व प्राप्त करून घेतले. जीवनमुक्ती मिळवून घेतली. जगातील एकमेव मानव ज्याने स्वतःकडे श्रेष्ठत्व घेतले नाही. ज्याचे त्याचे कर्म त्याचे जीवन घडविते, दुसरा कोणीही त्यास कारणीभूत होत नाही, तेव्हा जीवनात चांगले कर्म व चांगले विचार ठेवावेत.

- भन्ते बी. सारिपुत्त, सोलापूर

भगवान गौतम बुद्धांच्या अनुभवसिद्धीची गरज

संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश देणारे, युगप्रवर्तक भगवान गौतम बुद्ध असे म्हणतात की, ‘माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे’. या नव्या धम्मातून सामाजिक परिवर्तनाचे कार्य गौतम बुद्धांनी केले. त्यांच्या तत्त्वज्ञानात ज्ञान, कला, शिक्षण, समाजसेवा अशा विविध महान परंपरा धर्माद्वारे कायमस्वरूपी प्रस्थापित करताना समतेचा विचारही अग्रस्थानी असल्याचे दिसून येते. आजही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या अथांग ज्ञानाची ज्योत निरंतर तेवत ठेवली असल्यानेच त्यांना ‘लाईट ऑफ आशिया’ म्हणून संबोधले जाते. आज संपूर्ण मानवजातीला गौतम बुद्धांच्या चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग, सम्यक समाधी आणि निर्वाण शांतम या सिद्धांतांच्या अनुभवसिद्धीची नितांत गरज आहे.

-प्रा. डॉ. राजाराम पाटील,वसुंधरा कला महाविद्यालयात, सोलापूर

कुशल कर्म हा बुद्ध तत्त्वज्ञानातील महत्त्वाचा गाभा

जीवन जगण्याची सुखकर संहिता म्हणजे ‘धम्म’ आणि अलौकिक प्राण्यावरील श्रद्धा म्हणजे ‘धर्म’ या दोन भिन्न भिन्न संकल्पना आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे. विवेक आणि करुणेचा अपूर्व संगम म्हणजे बुद्धाचा धम्म. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे बुद्ध. अहिंसा, कुशलकर्म पंचशील तत्त्व आणि अष्टांग मार्ग यांसारख्या घटकांना समजून घेणे म्हणजे बुद्ध धम्म जाणणे होय. अहिंसेचे तत्त्वज्ञान बुद्ध धम्मात केंद्रस्थानी मानले जाते. बुद्धाची अहिंसा सम्यक मार्गाने मार्गक्रमण करणारी आहे. भगवान बुद्धाच्या अहिंसेचे असे सूत्र आहे जे त्यापूर्वी इतर कोणत्याही तत्त्ववेत्त्याने जगाच्या पाठीवर मांडले नाही. सर्वांनी समानतेचा मार्ग अनुसरावा, प्राणीमात्रावर दया करावी यांसारखी पंचशील तत्त्वे धम्मात असल्यानेच ती लोकप्रिय होऊन अनेक अनुयायी धम्मात येऊ लागले. कुशल कर्म हा ही बुद्ध तत्त्वज्ञानातील महत्त्वाचा गाभा आहे.

- प्राचार्या डॉ. मीना गायकवाड,वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर

जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारा बुद्ध

बुद्ध संचित काल आणि आजही वंचित. दुःखांच्या कारणांचा शोध घेऊन जग दुःखमुक्त करण्यासाठी राजगृह सोडणारा, अडीच हजार वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीला आव्हान देऊन देव- दैव स्वर्ग- नरक आदींना धक्के देत विद्रोह करणारा, अग्नीने अग्नी विझत नाही, हिंसेने हिंसा संपत नाही असे सांगून जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारा, बुद्ध धर्म नव्हे धम्म, बुद्ध मुक्तिदाता नव्हे जगातला एकमेव मार्गदाता, नालंदा, तक्षशिला जळताना आणि अजिंठा घाव सोसताना फक्त स्मितहास्य करणारा, हिरोशिमा-नागासाकी बेचिराख होऊनही पुन्हा फिनिक्स होऊन भरारणारा, पोखरण चाचणीला हसणारा, बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून उतरलेल्या आधुनिक भारताच्या राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्त्वांचा भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी पुरस्कार केला आहे.

- डॉ. रमाकांत पाटील,प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय, मुरूम

बुद्ध विचाराशिवाय जगाला पर्याय नाही

बुद्ध विचार असा आहे की, वैराने वैर कधीच शांत होत नाही. अवैराने वैर शांत होते. युद्धाने युद्ध कधीच शांत होत नाही तर शांतीनेच युद्ध शांत होते. तर जगात जे थैमान सुरू आहे, त्यांना बुद्ध विचारच तारणारा आहे. बुद्ध विचार हा विश्व, बंधुत्व, समता, न्याय करुणेचा संदेश देतो. यामुळे मानवाच्या दुःखमुक्तीचा विचार तथागत भगवान बुद्ध जगाला सांगतात. त्यामुळे बुद्ध विचाराशिवाय जगाला पर्याय नाही.

- डॉ. संघप्रकाश दुड्डे, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com