सोलापूर : CNG ची वाटचाल ‘शंभरी’कडे!

वाहन कोणते वापरू? चारचाकी वाहनधारकांची वाढली चिंता
CNG Price Updates
CNG Price UpdatesEsakal

सोलापूर : ‘वाढता वाढता वाढे’प्रमाणे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर शंभरी पार झाले आहेत. याला पर्याय म्हणून वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा वापर सुरू केला आहे. त्याप्रमाणे सीएनजी वाहनांची संख्याही शहरात वाढली आहे. इतर इंधनापेक्षा सीएनजीचे दर कमी असल्याचे कंपन्यांकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र सीएनजीचे दरही आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोचल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे.

शंभरी पार केलेल्या पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून अनेकांनी लाखो रुपये खर्च करून सीएनजीवरील वाहने त्याचबरोबर जुन्या वाहनांना सीएनजी किट बसविण्यात हजारो रुपये खर्च केले. मात्र, काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे व सीएनजी इंधनाच्या दराचीही शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने वाहनधारकांना कोणती गाडी वापरू, हेच कळेनासे झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

मागील महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या. यामुळे वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, आजच्या घडीला डिझेल आणि सीएनजी यांच्या दरामध्ये केवळ चार रुपयांची तफावत आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. कोणत्या इंधनाची गाडी वापरावी, हा प्रश्न वाहनधारकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात एकूण सीएनजीचे सहा पंप आहेत. दररोज जिल्ह्यात नऊ हजार किलो सीएनजीची विक्री होत असली तरी आता सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दरवाढीमुळे आणि तुटवड्यामुळे अनेक वाहनधारकांना सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

पाच महिन्यांत

१४.५९ रुपयांची वाढ

जानेवारी ते मार्चमध्ये सीएनजीचा दर ८१ रुपये होता. एप्रिल महिन्यात ८४ रुपये किलो दराने सीएनजीची विक्री झाली. मे महिन्यात सोलापूरमध्ये ९५.५९ रुपये किलो दराने सीएनजी मिळत असल्याने डिझेलच्या बरोबरीने दरवाढ झाली आहे.

दिवसाला जिल्ह्यात

९ हजार किलो सीएनजी विक्री

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सीएनजी पंपांना पुण्याहून ॲल्युमिनियम बॉटल अर्थात कंटेनरमधून गॅस आणून ज्या-त्या पंपांना कॉम्प्रेस्ड पद्धतीने भरून दिला जातो. सोलापूरमध्ये जरी सीएनजी वाहने कमी असली तरी दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनांची ये-जा असल्याने आणखी पंपांची व गॅसपुरवठा वाढविण्याची मागणी आता होऊ लागली आहे. त्यामुळे सीएनजी पंपांची संख्या वाढू लागली आहे, अशी माहिती सीएनजी विक्रेत्यांनी दिली.

सीएनजी किटला वाढली मागणी

कंपन्यांच्या सीएनजी चारचाकी वाहनांना वेटिंग असल्यामुळे जुन्या पेट्रोल वाहनांचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या किटला दर्जाप्रमाणे ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. किटची रीतसर नोंद सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे होते. त्यासाठी कार्यालयाकडून वाहन सीएनजी असल्याचे प्रमाणपत्रही मिळते.

पेट्रोल प्रति लिटर

१११.१४

डिझेल प्रतिलिटल

९८.१३

सीएनजी प्रतिकिलो

९५.५९

जिल्ह्यात एकूण सहा सीएनजीचे पंप आहेत. दररोज नऊ हजार किलो सीएनजीची व्रिकी होते. मात्र सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने नक्कीच येत्या महिनाभरात सीएनजीचे दर शंभरी गाठतील.

- प्रवीण कुलकर्णी, सीएनजी पंपचालक

प्रदूषण कमी व्हावे यादृष्टीने सरकारने सीएनजीचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी सीएनजीवरील गाड्या घेतल्या किंवा किट बसविले. यात मोठी गुंतवणूक केली. मात्र पंपांची कमतरता असल्याने साहजिकच वाहनचालक पुन्हा पेट्रोल-डिझेलकडे वळत आहेत. पेट्रोल-डिझेलइतकेच सीएनजीचे दर असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

- श्रीपाद कुलकर्णी, वाहनधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com