#Specialtyofvillage गावात प्रत्येक घरात किमान एक तरी हमाल

#Specialtyofvillage गावात प्रत्येक घरात किमान एक तरी हमाल

सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी घेऊन ग्रामस्थांनी मुंबई, कोल्हापूरसारखी शहरे जवळ केली. हळूहळू ही संख्या वाढतच गेली. आज या गावात प्रत्येक घरातील किमान एक तरी माणूस हमाली करताना दिसतो.

ऐतिहासिक पन्हाळगडापासून अवघ्या सहा किलोमीटरवर डोंगर कपारीत वसलेलं दळवेवाडी तसे दुर्गमच. अवघ्या ८१ घरांचे व ४७४ लोकसंख्येचे गाव. येथील प्रत्येक घरातील किमान एक तरी माणूस हमाली करतो. गावातील लोक मुंबई, कोल्हापूर, मलकापूर व कराड येथे हमालीसाठी जातात. म्हणूनच दळवेवाडीची ओळख हमालांचे गाव अशी झाली.

कातळाचा कठीणपणा, कडेकपारीतून वाहणाऱ्या वाऱ्याची लवचिकता, पहाडी आवाज, गावचे श्रद्धास्थान असलेल्या बजरंगबलीची ताकद, मसाई देवीचा आशीर्वाद घेऊन जन्माला आला तरीही इथल्या प्रत्येक माणसाच्या नशिबी फक्त कष्ट आहेत, असे म्हणावे लागेल. गावाला पहिला कच्चा रस्ता १९८३ मध्ये झाला. रस्ता कच्चा असल्याने दिवसाकाठी दोन गाड्या त्याही फक्त उन्हाळ्यातच येत. त्यामुळे रस्ता होऊनही दळवेवाडीकरांचे हाल काही कमी झाले नाहीत. ९० च्या दशकात पक्का रस्ता झाला व हळूहळू गावाने विकासाची दिशा पकडली. आजघडीला दळवेवाडीत घरटी दुचाकी आहे.

उत्तरेला मसाई पठाराचा डोंगर, तर दक्षिणेला तीव्र उतार म्हणूनच स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला. उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर गेलेच पाहिजे, त्यातही अशिक्षितपणा वाट अडवून उभा. एकच पर्याय तो म्हणजे हमाली. हमाली करायची तर मोठी बाजारपेठ पाहिजे म्हणून मुंबई, कोल्हापूरसारखी शहरे जवळ केली. त्यावेळी गावातून गाडी नव्हती. पन्हाळगडावर चालत जाऊन गाडी पकडावी लागे. अशी सगळी अडथळ्याची शर्यत जिंकायचीच, असा निश्‍चय करून खांद्यावर टॉवेल टाकून दळवेवाडीकरांपैकी काहीजण मुंबई येथील गोदीत, तर काहीजण कोल्हापुरातील मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी येथे दाखल झाले.

वयाच्या सतराव्या वर्षांपासून मुंबई येथील गोदीत हमाली करणाऱ्या आणि फक्त स्वाक्षरी करता येत नाही, या एकाच कारणामुळे तेथील हमाली सोडावी लागल्याची खंत आनंदा सावेकर यांनी व्यक्त केली. गोदीतील काम सुटल्यानंतर सावेकारांनी कोल्हापुरात वेअरहाऊसमध्ये काम सुरू केले. येथे कामाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘‘१०० हमालांना प्रत्येकी १२०० पोती याप्रमाणे २७ ट्रक माल असलेली रेल्वेची पूर्ण वॅगन आठ तासांत रिकामी करावी लागत असे. शंभर किलोचे एक पोते उतरवण्यास २५ पैसेप्रमाणे हमाली मिळत होती.

हमाली करताना शिक्षणाचे महत्त्व पटले. म्हणूनच त्यांनी आपली पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये व मुलांनाही हमाली करावी लागू नये, यासाठी गावातच शहराच्या धर्तीवर चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी राहावी, असे ध्येय ठरविले. त्यासाठी धनाजी दळवी यांनी सतत सात वर्षे मुंबई येथील एम्पथी फौंडेशनकडे पाठपुरावा केला आणि २०१२ मध्ये एक कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील पहिली आधुनिक पद्धतीची सरकारी शाळेची इमारत उभी केली. तत्पूर्वी वैचारिक समृद्धीसाठी, सभोवतालच्या व जागतिक घडामोडी गावातील लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून गावात २००४ मध्ये वाचनालय सुरू केले. हमाली करत गावाचा विकास कसा करावा, याचे धडे मात्र दळवेवाडीने जिल्ह्याला दिले.

हमाली दहा पैसे
आमच्या काळात शंभर किलोचे पोते उतरवण्यास दहा पैसेप्रमाणे हमाली मिळत असे. रोज गावाला जाणे शक्‍य नसल्याने पंधरा-पंधरा दिवस कोल्हापुरात राहिलो. कधी दुकानाबाहेरील फळीवर, तर कधी मालकाच्या दुकानाची राखण करतो, असे सांगून दुकानात झोपून दिवस काढल्याचे येथील नव्वदीतील सदू राऊ दळवी यांनी सांगितले.

एम्पथी फौंडेशनने हमालांची शिक्षणाबाबतची तळमळ पाहून शाळेची इमारतच नव्हे; तर गावाला पिण्याच्या पाण्याची टाकी दिली. आरोग्य शिबिरातून परिसरातील १३५ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली. एक हजार जणांना चष्मे मोफत वाटले.

- सुनीता गवळी, सरपंच, कणेरी-दळवेवाडी

‘सकाळ’ने हमालांचे वाचनालय या मथळ्याखाली प्रसिद्धी दिल्यामुळेच कष्टकऱ्यांच्या वाचनालयाला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन मदत दिली.

- धनाजी दळवी, वाचनालयाचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com